मुख्यमंत्री – युवा कार्य प्रशिक्षण योजना’ फॉर्म भरण्यास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

मुख्यमंत्री – युवा कार्य प्रशिक्षण योजना’ फॉर्म भरण्यास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

Spread the love



धाराशिव (प्रतिनिधी) – महायुती सरकारने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण-कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ राबवली जात आहे. या योजनेतंर्गंत 18 ते 35 वयोगटाच्या प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना 12 वी पास – 6,000, आय.टी.आय./पदविका – 8,000 व पदवीधर/पदव्युत्तर साठी महिना 10,000 प्रमाणे रक्कम मिळणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या या योजनेसाठीच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. आस्थापना/उद्योग/महामंडळामार्फत विना अनुभवी, बेरोजगार, इच्छुक पात्र उमेदवारांना प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येईल. या योजनेअंतर्गत उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत कार्य प्रशिक्षणाद्वारे कुशल/अर्धकुशल प्रकारचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे. सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने आहे. प्रशिक्षणा दरम्यान प्रशिक्षणार्थीची दैनिक हजेरी संबंधित आस्थापना/उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. सदर ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन प्रशिक्षणार्थीच्या थेट बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने दरमहा अदा करण्यात येईल. प्रशिक्षणार्थी महिन्यातून दहा दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असला तर संबंधित प्रशिक्षणार्थीस त्या महिन्याचे विद्यावेतन अनुज्ञेय राहणार नाही. या योजनेअंतर्गत खाजगी क्षेत्रातील आस्थापना उद्योजकाकडे एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या 10% व सेवा क्षेत्रासाठी 20% इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील. केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय/निमशासकीय या आस्थापना/उद्योग/ महामंडळ यामध्ये मंजूर पदाच्या 5% इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील. सदरच्या सहा महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनांमार्फत शैक्षणिक अर्हतेच्या निकषानुसार विद्यावेतन दिले जाईल. या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग आस्थापना यांना योग्य वाटल्यास व उमेदवाराची इच्छुक असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील. या कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येणार आहे.
     राज्य शासनाने योजनेची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी राज्यभरातील युवकांनी प्रतिसाद दिला आहे. पण या योजनेमुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी युवकांचा गोंधळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी सर्व्हर जाम, पोर्टल बंद अशा अनेक समस्यांना युवक तोंड देताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने ग्राम स्तरावर रचना लावून ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरून घेत असल्याचे डॉ सरोजनीताई राऊत यांनी सांगितले. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आस्थापना व उद्योजक यांची 66 शासकीय व 12 खाजगी अशा एकूण 78 आस्थापना व उद्योजकांची नोंदणी झालेली आहे. मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत अधिसूचित करण्यात आलेली 6110 शासकीय व 1443 खाजगी असे एकूण 7553 इतकी रिक्त पदे आहेत. तर मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत 6358 इतक्या उमेदवाराची नोंदणी झाली आहे. 30 ऑगस्ट, 2024 पर्यंत आस्थापनेमध्ये 6679 शासकीय व 816 खाजगी असे एकूण 7495 इतक्या उमेदवारांची निवड झाली आहे. तसेच आस्थापनामध्ये 4525 शासकीय व 450 खाजगी असे एकूण 4975 इतके उमेदवार प्रशिक्षणासाठी रुजू झाले आहेत.
      यापुढेही योजनेपासून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. फॉर्म भरताना कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत जाऊन योजनेची माहिती सांगून सदर योजनेचे फॉर्म भरून घेण्याचे काम केले आहे. नवीन सुधारित जी.आर. नुसार नोंदणी करण्यास सुलभता आली आहे. युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरीता एका उमेदवारास एकदाच लाभ घेता येईल त्यांनी पुन्हा अर्ज करू नये. अद्यापही अर्ज सादर न केलेल्या 18 ते 35 वयोगटातील पात्र उमेदवारांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावे, असे आवाहन डॉ. सरोजनीताई राऊत यांनी केले आहे.
     ‘मुख्यमंत्री – युवा कार्य प्रशिक्षण’ योजनेला सर्वत्रच उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पात्र उमेदवरांकडून ऑफलाईन केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील. प्रवासात युवकांनी भरलेले फॉर्म व मिळत असलेल्या प्रतिसादावर बोलत असताना डॉ सरोजनीताई राऊत  म्हणाल्या की, राज्य सरकारने बेरोजगारीवर आळा घालण्यासाठी या योजनेची सुरुवात केले आहे. राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व व्यवसायाच्या शोधात बाहेर पडत असतात. अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधीतचा अनुभव नसल्याने व्यवसाय सुरू करणे किंवा नोकरी मिळवण्यामध्ये बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत असते. अशा अडचणीमुळे तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी समस्या उद्भवत आहेत. म्हणून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये 12 वी पास, विविध ट्रेड मधील आय.टी.आय., पदवीधारक पदवी आणि पदव्युत्तर उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्र मध्ये विविध उद्योग क्षेत्रात प्रचंड रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत तरी उद्योग आणि बेरोजगारांमध्ये ताळमेळ नसल्याने अनुभवा अभावी युवकांना शिक्षणानंतरही रोजगार मिळणे कठीण होत असल्याचे दिसत आहे. अशा विविध योजना राबवून राज्य सरकार बेरोजगारी चे प्रमाण कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. परंतु विरोधकांकडून या योजनेवर बोट ठेवण्याचे काम चालू आहे. राजकीय धोरण असल्याचे सांगून सरकारने काढलेल्या योजना फसव्या असल्याचे सांगत अपप्रचार पसरविण्यात येत आहे. अशा कोणत्याही अपप्रचाराला पात्र उमेदवारांनी बळी पडू नये, असे डॉ. सरोजनीताई राऊत यांनी यावेळी सांगितले.
     ‘मुख्यमंत्री – युवा कार्य प्रशिक्षण योजना’ या योजनेसंदर्भात उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण होत असून, त्यांना योजनेची योग्य माहिती मिळणे खूप महत्त्वाचे आहे म्हणून कळंब आणि धाराशिव तालुक्यामध्ये डॉ.सौ.सरोजनीताई संतोष राऊत या बहुतांश गावांमध्ये प्रवास करत आहेत. तसेच कार्यकर्ते व व्यवस्थेच्या माध्यमातून ‘मुख्यमंत्री – युवा कार्य प्रशिक्षण योजना’ या योजनेची माहिती पत्रकाद्वारे व प्रत्यक्ष प्रवास करून लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्याचे कार्य चालू असल्याचे सांगितले. अशा शासनाच्या विविध योजनांची जनजागृती करून, फॉर्म भरून घेत आहेत. तसेच फॉर्म बद्दलची स्थिती समजून घेणे आणि संबंधित शासकीय अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आवाहन डॉ. सरोजनीताईंच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *