महायुती सरकारकडून आलुरे गुरूजींच्या कार्याचा सन्मानऔद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या नामफलकाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते अनावरण

महायुती सरकारकडून आलुरे गुरूजींच्या कार्याचा सन्मान

औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या नामफलकाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते अनावरण

Spread the love

धाराशिव (प्रतिनिधी) – वेळप्रसंगी स्वतःच्या पगारातून आलुरे गुरूजींनी गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली. केवळ गुणात्मक पात्रता ध्यानात घेवून अनेकांना नोकरी दिली. तुळजापूर तालुक्यासह परिसरातील गोरगरीब मुलामुलींना आलुरे गुरूजींचा जन्मदात्या पित्याप्रमाणे आधार वाटत असे. सर्वसामान्यांच्या शिक्षणासाठी गुरूजींनी आयुष्यभर घेतलेल्या परिश्रमांना मोठ्या सन्मानाने आपण सर्वांनी पुढे न्यायला हवे. त्यासाठी महायुती सरकारने सि. ना. आलुरे गुरूजी यांचे नाव तुळजापूरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राला दिले आहे. हा निर्णय म्हणजे आदरणीय गुरूजींनी दिलेल्या योगदानाचा सन्मान असल्याची भावना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली.

तुळजापूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या नामफलकाच्या अनावरणाचा कार्यक्रम आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते रविवारी पार पडला. यावेळी ते बोलत होते. तालुक्यातील गोरगरीब मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी आलुरे गुरूजींनी जाणीवपूर्वक शैक्षणिक संस्थांचे जाळे निर्माण केले. हे करत असतानाच आमदारकीच्या माध्यमातून जनसेेवेचे व्रतही अत्यंत प्रामाणिकपणे त्यांनी पार पाडले. लोकशिक्षक आणि प्रामाणिक जनसेवक म्हणजे काय, याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे आलुरे गुरूजी होय. म्हणूनच मराठवाड्याचे साने गुरूजी म्हणून मोठ्या आदराने त्यांचा आजही गौरव केला जातो.


गुरूजींच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेत आपल्या मागणीला कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उत्स्फूर्तपणे अनुकूलता दर्शविली आणि गुरूजींचे नाव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राला देण्याचा शासन निर्णय निर्गमित केला. त्यांच्या सहवासातून जनसेवेचा आदर्श वस्तुपाठ अंगिकारण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत, असे सांगत असताना आलुरे गुरूजींच्या आठवणींनी आमदार पाटील यांना भरून आले. काही वेळ या भारावलेल्या प्रसंगी आमदार पाटील भावुकही झाले होते. यावेळी उपस्थितांसह सर्व मान्यवरांनी आलुरे गुरूजींना पाच मिनिटे स्तब्ध राहून आदरांजली वाहिली. प्रास्ताविक विकास उपासे यांनी केले. यावेळी अ‍ॅड. दीपक आलुरे, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, संतोष बोबडे, वसंत वडगावे, नारायण नन्नवरे, निळकंठ वट्टे, आनंद कंदले, हनुमंत भुजबळ, सिध्देश्वर कोरे, प्रदीप वाले, लक्ष्मण उळेकर, आनंद उपासे, दयानंद मडके, अप्पू जेवळे, गुरुनाथ बडुरे, विजय शिंगाडे, केदार आलुरे आदींसह अणदूर, नळदुर्ग आणि तुळजापूर परिसरातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *