
झेडपी सदस्य ते दोनवेळा आमदार – कैलास (दादा) पाटील
धाराशिव तालुक्यातील सारोळा (बुद्रुक) गावच्या ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषद सदस्य ते आमदार अशी समाजकारण आणि राजकारणात दमदार एन्ट्री करणारे धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार कैलास (दादा) पाटील यांचा आज वाढदिवस. यानिमित्ताने त्यांच्या कार्याविषयी थोडक्यात…
धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघातील जनतेने आमदार कैलास (दादा) पाटील यांना दुसर्यांदा विधानसभेत पाठविले आहे. त्यांच्यावरील विश्वास आणि जनतेचे प्रश्न सोडविण्याच्या कामाची पद्धती पाहूनच जनतेने त्यांना दुसर्यांदा संधी दिली. या संधीचे सोने करुन यापुढेही मतदारसंघातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, बेरोजगार, विद्यार्थी अशा सर्व घटकांना ते न्याय मिळवून देतील हे निश्चित आहे.
आमदार कैलास (दादा) पाटील यांचा राजकीय प्रवासातील संघर्ष मोठा आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य असताना त्यांना दुसर्या वेळेस संधी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. आणि पुन्हा जिल्हा परिषदेत त्यांना संधी मिळाली. ग्रामीण भागात शेतकर्यांसाठी केलेली कामे त्यांच्यासाठी या निवडणुकीत जमेची बाजू ठरली. दरम्यान 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली. या निवडणुकीतही ते विजयी झाले. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी देखील त्यांच्यावर सोपविण्यात आली. जुन्या-नव्या शिवसैनिकांशी मोट बांधून त्यांनी मतदारसंघात शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत करण्यावर भर दिला.
याच काळात 2020 मध्ये कोविडमुळे जग ठप्प झालेले असताना आमदार कैलास (दादा) पाटील यांचे मतदारसंघात काम सुरुच होते. धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश (दादा) राजेनिंबाळकर यांच्या सोबतीने त्यांनी नगर परिषद, ग्रामपंचायतींना वेळोवेळी मार्गदर्शक सूचना करुन तसेच आरोग्य यंत्रणा, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय राखून त्यांनी मतदारसंघात कोविडची लागण रोखण्यासाठी प्रयत्न केले. क्वारंटाईन सेंटरमधील सोयीसुविधा, औषध पुरवठा याबाबत ते स्वतः लक्ष ठेवून होते. कोविड काळातच धाराशिव-कळंब मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे मोठे हाल झाले. नदीकाठच्या गावचे अनेकजण पुराच्या तडाख्यात सापडले. त्यांच्या बचावासाठी एनडीआरएफ सारख्या यंत्रणेशी संपर्क साधून पूरग्रस्तांची सुखरुप सुटका केली.
कोविडचे सावट दूर झाल्यानंतर त्यांनी 2022 मध्ये ऐन दिवाळी शेतकर्यांच्या थकीत पीकविम्यासाठी बेमुदत उपोषण आंदोलन केले. तसेच पीकविम्यासाठी विमा कंपनीला हायकोर्टात खेचून शेतकर्यांना पीकविमा मिळवून देण्यासाठी ताकद लावली. त्यामुळे शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला. यापुढेही शेतकरी, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी ते झगडत राहणार. संघटन कौशल्य आणि सतत जनसंपर्कात असणारे हे नेतृत्त्व पुढील काळात लोकाभिमुख कामे करत राहणार यात शंका नाही.
माझ्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये गेल्या चाळीस वर्षात जी कामे झाली नाहीत, त्या कामांसाठी कैलास (दादा) पाटील यांनी भरघोस निधी उपलब्ध करुन प्रलंबित कामे मार्गी लावली. या भागातील अंतर्गत रस्ते, नालीच्या कामांना या निधीमुळे मूर्त स्वरुप मिळाले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांची पावसाळ्यात होणारी गैरसोय देखील दूर होण्यास मदत झाली आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन लढण्याचे बळ देणार्या या व्यक्तीमत्त्वामुळे धाराशिव शहरातील अनेक कामांना चालना मिळाली आहे.
सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन सतत संपर्कात राहणे, कोणत्याही वेळी जनतेच्या कामासाठी तत्पर राहणे या त्यांच्या अंगभूत गुणामुळे धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघातील जनतेने आमदार कैलास (दादा) पाटील यांनी पुन्हा संधी दिली. त्याआधी गद्दारी करुन पक्षात फूट पाडणार्यांपासून दूर राहात त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्त्वाशी ठाम राहून आपल्यातील प्रामाणिक शिवसैनिकाची ओळख करुन दिली, हे जगजाहीर आहे.
कैलास (दादा) पाटील दुसर्यांदा विधानसभेत जावेत यासाठी मी स्वतः पायात चप्पल न घालण्याचा पण केला होता. हा पण पूर्ण झाल्यानंतर कैलास (दादा) पाटील स्वतः चप्पल घेऊन आले. आणि माझा पण पूर्ण केला. सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी इतकी जवळीक असणारे ते एकमेव आमदार आहेत. त्यामुळेच उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना धाराशिव जिल्ह्यात आजही भक्कम उभी आहे.
आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना हार्दिक शुभकामना.. त्यांना निरोगी उदंड आयुष्य लाभो ही आई येडेश्वरीचरणी प्रार्थना..
*प्रशांत (बापू) साळुंके*
शहर संघटक, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
धाराशिव

