
ढोकी येथे बर्ड फ्लूचा संसर्ग; 10 किमी परिसर ‘अलर्ट झोन’ घोषित
धाराशिव | 26 फेब्रुवारी 2025
धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील पोलीस स्टेशन परिसर आणि सुभाषराव देशमुख यांच्या घराच्या परिसरात एव्हियन इन्फ्लूएंझा (H5N1) विषाणूचा संसर्ग आढळल्याने संपूर्ण 10 किमी परिसर ‘अलर्ट झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी प्रकाश अहिरराव यांनी संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले आहेत.
प्रमुख उपाययोजना:
1. नागरिकांच्या हालचालींवर आणि पक्षी-प्राण्यांच्या वाहतुकीवर निर्बंध लागू.
2. बाधित परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी 2% सोडियम हायपोक्लोराईट किंवा पोटॅशियम परमॅंगनेट (KMnO₄) वापरण्याच्या सूचना.
3. बाधित क्षेत्रातील 10 किमी त्रिज्येतील कुक्कुट पक्ष्यांचे सर्वेक्षण करून नमुने प्रयोगशाळेत पाठविण्याचा निर्णय.
4. संसर्ग रोखण्यासाठी पशुसंवर्धन, आरोग्य, महसूल, पोलीस, ग्रामविकास, जलसंपदा, वन, बांधकाम आणि परिवहन विभागांचा समन्वय.
5. ‘Prevention and Control of Infectious and Contagious Diseases in Animals Act, 2009’ आणि ‘Action Plan for prevention, control & containment of avian influenza (Revised, 2021)’ अंतर्गत तातडीच्या उपाययोजना.
जिल्हा प्रशासनाने ढोकी गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, संदिग्ध रुग्ण किंवा पक्ष्यांच्या मृत्यूबाबत तातडीने प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.