
उष्माघातापासून बचावासाठी
आरोग्य विभागाने सुचविल्या उपाययोजना
धाराशिव दि.७ मार्च (प्रतिनिधी) जिल्ह्यात तापमान झपाट्याने वाढत असून,संभाव्य उष्माघात टाळण्यासाठी आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजना केल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेण्यात आली असून,नागरिकांना उष्माघाताबाबत जागरूक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात ५ ग्रामीण रुग्णालये,६ उपजिल्हा रुग्णालये,४४ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि २ शहरी आरोग्य केंद्रांमध्ये कोल्ड रूमची स्थापना करण्यात आली आहे.उष्माघाताच्या उपचारासाठी सर्व आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक औषधांचा मुबलक साठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे.
विशेष कृती दलाची स्थापना करून उष्णतेच्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी विशेष टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे.जागरूकता मोहिम राबविण्यात येत आहे. नागरिकांसाठी प्रसिद्धी साहित्य तयार करून जनजागृती करण्यात येत आहे.
उष्माघात टाळण्यासाठी काळजी घेतांना पुढील बाबीची खबरदारी घ्यावी
हे करा – पुरेसे पाणी प्या, प्रवासात पाणी सोबत ठेवा.हलके, फिकट रंगाचे आणि सैलसर कपडे परिधान करा.उन्हात गॉगल,टोपी, छत्री आणि पादत्राणे वापरा.घर थंड ठेवण्यासाठी ओलसर पडदे,पंखा किंवा कुलरचा वापर करा.
हे टाळा – शक्यतो दुपारी उन्हात घराबाहेर पडणे टाळा.कष्टाची कामे उन्हात करणे टाळा.बंद गाडीत लहान मुले ठेवू नका.मद्य,चहा,कॉफी आणि गॅसयुक्त पेये घेणे टाळा.शिळे अन्न आणि जड प्रथिनयुक्त आहार टाळा.
उष्माघाताची लक्षणे ही प्रौढांमध्ये शरीराचे तापमान १०४ °F पर्यंत वाढणे,तीव्र डोकेदुखी,स्नायूंचे ताणणे,मळमळ आणि उलट्या होणे,चक्कर येणे,हृदयाचे ठोके वाढणे आणि घाम येणे तर लहान मुलांमध्ये आहार घेण्यास नकार देणे, चिडचिड वाढणे,लघवीचे प्रमाण कमी होणे,डोळे आणि त्वचा कोरडी होणे व रक्तस्त्रावाची शक्यता अशाप्रकारची दिसून येतात.
गंभीर स्थितीत १०८ किंवा १०२ या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा. जिल्ह्यातील नागरिकांनी उष्णतेच्या लाटेकडे दुर्लक्ष न करता आवश्यक ती खबरदारी घ्यावी व सुरक्षित राहावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास यांनी केले आहे.
फोटो तयार करून द्या