
राज्याला आर्थिक व धोरणात्मक दिशा देणाऱ्या संस्थेच्या उपाध्यक्षपदी आ.राणाजगजितसिंह पाटील
‘मित्र’ उपाध्यक्ष म्हणून शासन आदेशाद्वारे केली निवड जाहीर
केंद्र सरकारच्या नीति आयोगाच्या धर्तीवर राज्यात ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ अर्थात ‘मित्र’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.राज्याची आर्थिक व धोरणात्मक दिशा ठरविणाऱ्या या महत्वपूर्ण संस्थेच्या उपाध्यक्षपदी तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष तथा अभ्यासू आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची निवड करण्यात आली आहे. गुरुवारी राज्य सरकारने तसा शासन आदेश जारी करीत आमदार पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे जाहीर केले आहे.
‘मित्र’ च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत तर सहअध्यक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार आहेत.या शासन निर्णयानुसार ‘मित्र’द्वारे कृषी व त्यासोबत संलग्न क्षेत्र, आरोग्य व पोषण, शिक्षण, कौशल्य विकास व नावीन्यता, नागरिकरण व बांधकाम क्षेत्र विकास, भूमी प्रशासन, वित्त, पर्यटन, क्रीडा, ऊर्जा संक्रमण, वातावरणीय बदल, उद्योग, लघुउद्योग, पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान, पूरक सेवा व दळणवळण आदी विविध क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून या क्षेत्रात महत्वपूर्ण काम केले जाणार आहे. राज्याच्या विकासाला आर्थिक, धोरणात्मक, तांत्रिक तसेच कार्यात्मक दिशा देणारा विचार गट म्हणून मित्र या संस्थेकडे पाहिले जाते. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठीच ही संस्था कार्यरत आहे. त्याशिवाय विविध शासकीय विभाग, भारत सरकार, नीती आयोग, सिव्हिल सोसायटी, विविध शासकीय संस्था तसेच खासगी व्यावसायिक संस्था यांच्यात सुसंवाद घडवून आणत विकासाच्या नवीन उपाययोजना सुचवण्यासाठी काम करण्याची जबाबदारी देखील ‘मित्र’ नावाच्या महत्वपूर्ण संस्थेवर सोपविण्यात आली आहे.
राज्य सरकारने गुरुवारी तसा शासन आदेश जारी करीत आमदार श्री राणाजगजितसिंह पाटील, आमदार श्री दिलीप वळसे पाटील व नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री राजेश क्षिरसागर यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. राज्याच्या विकासात प्रादेशिक समानता आणण्यासाठी विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्राकरिता ‘मित्र’साठी प्रादेशिक मित्रचीही स्थापन करण्यात येणार आहे. राज्य सरकारला आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आणि सीएसआर ट्रस्ट फंड यांच्याकडून विकासात्मक उपक्रमांसाठी राज्य शासनाच्या मालमत्तेचे मुद्रीकरण आणि सवलतीचा वित्तपुरवठा यांसारख्या नाविन्यपूर्ण साधनांद्वारे अर्थसंकल्पबाह्य संसाधने उभारण्याचा सल्ला देणे. राज्य शासनाच्या विविध विभागांना मदत करत असताना स्थानिक पातळीवरील नियोजन आणि विकासात्मक कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासाठी जिल्ह्यांचा डेटा अॅनालिटिक्स माध्यमातून सहाय्य करणे. अंमलबाजवणी करणाऱ्या यंत्रणांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी परिणाम अधारित रिअल टाईम मुल्यांकनाच्या माध्यमातून मदत देणे आदी महत्वपूर्ण आणि मूलभूत कामे ‘मित्र’च्या माध्यमातून साकारली जाणार आहेत. तसेच कमी प्रगती असणाऱ्या तालुक्यांमध्ये आणि शहरांमध्ये विकासाच्या विविध आणि लोकोपयोगी योजना राबविणे आणि त्या कामाचा वेळोवेळी आढावा घेणे हेदेखील मित्रचे महत्वाचे काम असणार आहे.
नियुक्तीबाबत प्रतिक्रिया देताना आ.राणाजगजितसिंह पाटील म्हणाले, राज्याचा विकास साधण्यासाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र) या संस्थेची स्थापना करताना त्यातील मूळ उद्देश साध्य करण्याची मोठी जबाबदारी आहे. नीती आयोगाशी संलग्न अशी “मित्र”या संस्थेची कार्यपद्धती असून अशा महत्वाच्या संस्थेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने मला राज्याची सेवा करण्याची एक सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. या नियुक्तीबद्दल या संस्थेचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार व्यक्त करतो. मित्र संस्थेच्या झालेल्या नियुक्तीच्या माध्यमातून राज्याचा विकास साध्य करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत.