
धाराशिवचे उपविभागीय अधिकारी संजय कुमार डव्हळे यांच्या निलंबनावरून जनतेत तीव्र नाराजी – न्याय मिळणार का?
धाराशिव : धाराशिवचे उपविभागीय अधिकारी संजय कुमार डव्हळे यांना ७ जानेवारी रोजी निलंबित करण्यात आले. या कारवाईसाठी सहा महिन्यांपूर्वीच्या नोटीसला त्यांनी दिलेले उत्तर समाधानकारक नसल्याचे कारण पुढे करण्यात आले. मात्र, या निर्णयामागील नेमके कारण अद्यापही स्पष्ट करण्यात आलेले नसल्याने जनतेत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच निलंबन केल्यामुळे अनेक शंका निर्माण झाल्या आहेत.
निलंबनामागील कारणांवर गूढ कायम
तात्कालीन उपविभागीय अधिकारी संजय कुमार डव्हळे यांनी महसूल विभागातील अनेक भ्रष्टाचारप्रकरणे उघडकीस आणली होती. त्यांनी पाहणी केल्यानंतर काही अधिकाऱ्यांनी डव्हळे यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप करत त्यांच्यावर कारवाईची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र, चौकशीचा अहवाल येण्यापूर्वीच डव्हळे यांच्यावर कारवाई झाल्याने ही कारवाई पूर्वनियोजित असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
डव्हळेंना टार्गेट केल्याची शक्यता
संजय कुमार डव्हळे यांनी धाराशिव जिल्ह्यातील अनेक मोठ्या भ्रष्टाचारप्रकरणांचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणांमध्ये काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याची चर्चा होती. त्यामुळेच डव्हळे यांना हेतुपुरस्सर निलंबित केल्याचा आरोप जनतेतून होत आहे.
न्यायासाठी संघर्ष – १७ मार्चला सुनावणी
निलंबनाविरोधात संजय कुमार डव्हळे यांनी आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे अपील दाखल केले आहे. मात्र, त्यावर सुनावणीस विलंब होत असल्याने डव्हळे यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. अखेर मागील महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांनी आपले म्हणणे सादर केल्यानंतर आता १७ मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
जनतेचे लक्ष – नूतन जिल्हाधिकारी काय भूमिका घेणार?
या सुनावणीत डव्हळे यांना न्याय मिळणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. नव्याने रुजू झालेल्या जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार या प्रकरणात लक्ष घालणार का आणि चौकशीचा निकाल डव्हळेंच्या बाजूने लागणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
डव्हळे यांच्या निलंबनामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भ्रष्टाचार विरोधात लढणाऱ्या अधिकाऱ्यांवरच कारवाई होत असेल, तर प्रामाणिक अधिकारी दबावाखाली येण्याची शक्यता असल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे. आता १७ मार्च रोजी होणाऱ्या सुनावणीत डव्हळे यांना न्याय मिळतो का, याची उत्सुकता सर्वसामान्यांना आहे.