
१० मार्चपासून ऊस तोडणी मशीन मालकांचे बेमुदत आंदोलन
साखर आयुक्तांना निवेदन सादर; तोडणी दरवाढीसह विविध मागण्या
पुणे, ५ मार्च: ऊस तोडणी मशीनच्या दरात ५० टक्के वाढ करावी, बँकेच्या हप्त्यांसाठी तीन वर्षांची मुदतवाढ द्यावी आणि पाचट कपात १.५ टक्के ठेवावी, अशा विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी मशीन मालक संघटना १० मार्चपासून बेमुदत आंदोलन छेडणार आहे. या मागण्यांचे निवेदन संघटनेचे सचिव अमोलराजे वसंतराव जाधव यांनी साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ यांना सादर केले. तसेच हे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री यांनाही देण्यात येणार आहे.
१३०० मशीन मालकांचा एल्गार
राज्यात सध्या सुमारे १३०० ऊस तोडणी मशीन कार्यरत आहेत. यातील काहींना अनुदान मिळाले असले, तरी २००९ पासून तब्बल ९०० मशीनधारकांना अद्याप अनुदान मिळालेले नाही. या संदर्भात वेळोवेळी आंदोलने झाली, मात्र ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता राज्यातील सर्व ऊस तोडणी मशीन मालक १० मार्चपासून साखर संकुलासमोर बेमुदत आंदोलन करणार आहेत.
ऊस तोडणी खर्च वाढला, दर मात्र अपुरा
ऊस तोडणी मशीनला प्रति टन अंदाजे ४६० रुपये खर्च येतो. यामध्ये –
डिझेल खर्च: २६०-२८० रुपये (३ लिटर प्रति टन)
ऑपरेटर आणि ड्रायव्हर पगार: ८० रुपये प्रति टन
दुरुस्ती, ग्रीस, स्पेअर पार्ट्स: १०० रुपये प्रति टन
याउलट, साखर कारखाने प्रति टन फक्त ४५० ते ५०० रुपये देतात. त्यामुळे तोट्याचा सामना करत बँकेचे हप्ते भरणे कठीण झाले आहे.
पाचट कपातीत अन्याय
आयुक्तांच्या निर्णयानुसार ४.५ टक्के पाचट कपात ही शेतकरी, ऊस तोडणीदार व वाहतूकदार यांच्याकडून एकूण १३.५ टक्के आकारली जात आहे. त्यामुळे हा अन्याय दूर करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.
संघटनेची ठाम भूमिका
यावेळी संघटनेचे अभय कोल्हे, राजाभाऊ लोमटे, धनंजय काळे, गणेश यादव, निलेश बागटे, कलीम शेख, शरद चव्हाण, राहुल इथापे, रजत नलावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. तोडणीदरात वाढ आणि बँक हप्त्यांची मुदतवाढ या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन सुरूच राहील, असा इशारा संघटनेने दिला आहे.