
बहुजनांसाठी लढणारा योद्धा – धनंजय शिंगाडे
सर्वसामान्य जनतेला जीवनात दररोज हजारो प्रश्नांचा मुकाबला करावा लागतो. त्यासाठी कोणत्या शासनदरबारी जावे, कोणाला भेटावे, कोणती कागदपत्रे द्यावीत याची कोणालाही माहिती नसते. सरकारी कार्यालयाचे हेलपाटे मारुनही जेव्हा आपले काम होत नाही तेव्हा प्रत्येकाच्या तोंडी नाव येते, ते म्हणजे धनंजय (नाना) शिंगाडे. राजकारणाचा कोणताही वारसा नसताना सर्व काही समाजासाठी हे ब्रीद घेऊन वाटचाल करणारे धनंजय (नाना) शिंगाडे यांचा आज वाढदिवस. यानिमित्ताने त्यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात शब्दपरिचय..
धाराशिव शहरातील उपेक्षितांची वस्ती असलेल्या भीम नगर येथे गंगाधर शिंगाडे यांच्या पोटी जन्म घेतलेले धनंजय नाना अत्यंत सामान्य जीवनशैलीत वाढले. लहानपणी शिक्षण घेत असल्यापासून कॉलेज वयापर्यंत त्यांनी समाजातील उच्च-नीच भेदभाव, जातीय तणाव अशा अनेक कारणांमुळे समाजात निर्माण होत असलेली दरी आणि दुही याची जाणीव पदोपदी घेतली. याच भावनेतून सर्व बहुजन समाजाला एकवटण्याची संकल्पना त्यांना सुचली. याच भावनेतून त्यांनी बालमित्रांपासून सर्वांना सोबत घेऊन एक सामाजिक चळवळ सुरु केली. शालेय जीवनापासूनच त्यांनी सुरु केलेल्या या चळवळीला आज मोठे वलय प्राप्त झाले आहे. त्यांच्या कार्याचा आलेख आज धाराशिव शहर, जिल्हा नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात सर्वदूर पोहचला आहे.
शिक्षणानंतर धाराशिव शहरातील आपल्या सर्व सवंगड्यांना सोबत घेत त्यांनी समाजकारण आणि राजकारणात एकाचवेळी उडी घेतली. त्यानंतर मागे वळून न बघता त्यांनी नगर परिषदेच्या राजकारणात आपला पाया भक्कम केला. आज अनेक प्रभागात उमेदवार निश्चित करताना मोठ्या राजकीय पक्षाचे नेते त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय उमेदवाराचे नाव घोषित करत नाहीत. हीच परिस्थिती जिल्हा परिषद, पंचायत समिती व इतर निवडणुकांमध्ये देखील असते ही त्यांच्या कार्याची पावती म्हणावी लागेल. दरवेळेस विधानसभा निवडणूक लागू होताच त्यांच्याकडे उमेदवारी घ्या म्हणून मागे लागणारे पक्ष अनेक आहेत. परंतु अनेकांना स्पष्ट नकार दिल्यानंतरही त्यांच्याकडे उमेदवारी घ्या म्हणून पक्षांची चढाओढ लागणे ही त्यांच्या समाजकारणाची एक मोठी बाजू म्हणावी लागेल.
धाराशिव शहरात भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आलेला होता. याच जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा यासाठी वेळोवेळी निवेदने, आंदोलने केली. नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत आवाज उठवून, विषयाचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले. त्यामुळेच आज धाराशिव शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा शहराची शान ठरला आहे.
धाराशिव शहरातील नाट्य व सांस्कृतिक चळवळीला धनंजय (नाना) शिंगाडे यांनी स्वतःला वाहून घेतले आहे. दिवंगत वडील गंगाधर शिंगाडे यांच्या नावाने ते दरवर्षी गंगाधर करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे ते नियमित आयोजन करतात. या कार्यात त्यांचे बंधू विशाल शिंगाडे, सुपुत्र प्रसेनजीत शिंगाडे व त्यांचे सहकारी सतत परिश्रम घेतात.
धाराशिव जिल्ह्यातील जातीय दंगली असो किंवा अन्य कारणावरुन समाजामध्ये निर्माण होणारी तेढ. प्रत्येकवेळी दोन्ही गटांमधील तेढ दूर करुन सामंजस्य घडविण्याचे काम प्रशासनाच्या आधी धनंजय (नाना) शिंगाडे जाऊन करतात. जीवाची पर्वा न करता कोणत्याही परिस्थितीत भावनिक झालेल्या लोकांना दिलाशाचे शब्द देऊन त्यांना सामाजिक सलोखा आणि संविधानाची जाणीव करुन देण्याचे काम धनंजय (नाना) शिंगाडे यांनी आजपर्यंत केलेले आहे. यापुढेही आपला सामाजिक कार्याचा हा वसा त्यांनी कायम ठेवला आहे. बहुजन समाजातील सर्व घटकांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी बहुजन योद्धा सामाजिक संघटनेची स्थापना केली. या संघटनेत अठरापगड जातीमधील लोकांनी सहभाग नोंदवून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. आज ही संघटना सर्वात पॉवरफुल्ल संघटना झाली आहे.
धाराशिवच्या महसूल प्रशासनाने सुमारे साडेबारा हजार एकर इनामी, मदतमास, खिदमत मास, सीलिंग व महार वतन जमीन रातोरात वर्ग एकमधून वर्ग दोनमध्ये घेऊन शेतकरी व प्लॉट धारकांवर अन्याय केला. तेव्हा धनंजय (नाना) शिंगाडे प्रथम रस्त्यावर उतरले. त्यानंतर राजकीय नेत्यांना, मंत्र्यांना निवेदने देऊन झालेल्या अन्यायाला वाचा फोडली. तरीही प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयापासून मंत्रालयापर्यंत हेलपाटे मारले. वेळोवेळी उपोषण आंदोलन, मोर्चे काढल्यानंतर अखेर हा प्रश्न मार्गी लागला आहे.
त्याचबरोबर शहरासह ग्रामीण भागातील नागरी समस्यांचे निराकरण करण्यासाठी धनंजय (नाना) शिंगाडे सदैव तत्पर असून भविष्यात देखील अशा अडचणी सोडविण्यासाठी आपण सज्ज असल्याची भावना ते व्यक्त करतात.