
जि. प. प्रा. शाळा बरमगाव बू येथे शिवजयंती उत्साहात साजरी
धाराशिव तालुक्यातील बरमगाव बू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. जि. प. प्राथमिक शाळेत आयोजित या सोहळ्याची सुरुवात शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष बळीराम सिरसाठे यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. यानंतर भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी लेझीम व झांज पथकाच्या माध्यमातून महाराजांच्या जीवनपटाचे प्रभावी सादरीकरण केले.
शाळेतील शिक्षक विजयकुमार फरताडे सर यांनी मागील दहा दिवस अथक परिश्रम घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शिवकालीन मर्दानी खेळांचे सादरीकरण करत गावकऱ्यांची मने जिंकली. मिरवणुकीनंतर शाळेत प्रथम विस्ताराधिकारी शिंदे मॅडम यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली. तसेच, बळीराम सिरसाठे यांनी शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला.
यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर भाषणे सादर केली. एन. एम. एस. परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार विस्तार अधिकारी शिंदे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला. ग्रामसमृद्धी सामाजिक संस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र व “शिवाजी कोण होता?” हे पुस्तक बक्षीस म्हणून देण्यात आले. जय भवानी तरुण गणेश मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला गावच्या सरपंच शोभाताई बाळकृष्ण गोरे, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मिरताई घोडके, उपाध्यक्ष बळीराम सिरसाठे, शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर, ग्रामसमृद्धी सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष अमर आगळे व अभिमान जाधव, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, बचत गटाच्या महिला, माजी विद्यार्थी, विविध समित्यांचे सदस्य, शाळेतील शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य आणि लहान मुले उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फरताडे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिंदे मॅडम यांनी मानले. या शानदार सोहळ्याने उपस्थित सर्व नागरिकांना प्रेरणा दिली आणि शिवरायांच्या विचारांची महती अधोरेखित केली.


