
चंदनाच्या झाडांची चोरी रोखणाऱ्या शेतकऱ्यांना बेदम मारहाण – ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल!
धाराशिव जिल्ह्यातील वाणेवाडी येथे दि. 5 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजता घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. नैसर्गिकरीत्या उगवलेल्या चंदनाच्या झाडांची चोरी रोखण्याच्या प्रयत्नात दोन शेतकऱ्यांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब साहेबराव उंबरे यांच्या शेताच्या बांधावर चंदनाची झाडं उगवली होती. गणपती चव्हाण आणि गोपाळ गणपती चव्हाण हे दोघे ती झाडे चोरून नेत असल्याचे शेतकऱ्यांनी पाहिले. त्यांनी आरोपींना जाब विचारला असता, आरोपींनी त्वरित शिवीगाळ सुरू केली आणि नंतर हल्ला चढवला.
या भयानक हल्ल्यात, गोपाळ चव्हाण याने भाऊसाहेब उंबरे यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा मारल्याने ते गंभीर जखमी झाले. तसेच मुकुंद विजयकुमार उंबरे यांच्यावर दगड फेकून हल्ला करण्यात आला, ज्यामुळे त्यांनाही गंभीर दुखापत झाली आहे. आरोपींनी दोन्ही शेतकऱ्यांना जीव मारण्याची धमकी दिली.
या हल्ल्यानंतर वाणेवाडी गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भाऊसाहेब उंबरे आणि मुकुंद उंबरे यांनी ढोकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आरोपी गणपती चव्हाण आणि गोपाळ चव्हाण यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या 118(1), 195, 352, 351(2), 351(3), 3(5) या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.