
तुळजापूर पोलीस ठाण्यात पवनचक्की गुत्तेदारांचे उघड शस्त्र प्रदर्शन – प्रशासन गप्प का ?
तुळजापूर (प्रतिनिधी) – तुळजापूर तालुक्यात पवनचक्की कंपन्यांचे काम वेगाने सुरू आहे. याच कंपन्यांचे ठेकेदार आणि गुत्तेदार सध्या सतत तुळजापूर पोलीस ठाण्यात दिसून येत आहेत. आलीशान गाड्यांमध्ये येणारे हे ठेकेदार मजबूत बॉडीगार्डसह फिरत असून त्यांच्या कमरेला उघडी पिस्तूल दिसत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक आणि शेतकरी दहशतीच्या छायेखाली आहेत.


पोलीस ठाण्यात व्हीआयपी संस्कृती?
या गुत्तेदारांना पोलिसांकडून कोणता विशेष दर्जा मिळतोय का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिस ठाण्यात नियमित येणाऱ्या या ठेकेदारांचे नक्की कोणते काम आहे? तक्रारदार म्हणून येत आहेत की इतर कोणत्या कारणांसाठी, हे अजूनही स्पष्ट नाही.
शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण!
पवनचक्की कंपन्यांचे काही व्यवहार संशयास्पद असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अनेक वेळा कंपन्यांची मनमानी थांबवण्यासाठी शेतकऱ्यांनी आवाज उठवला आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी ठेकेदारांच्या दादागिरीला तोडीस तोड उत्तर दिले आहे. मात्र, या सर्व घडामोडींमध्ये ठेकेदारांना धोका आहे की शेतकऱ्यांना, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
पोलिसांची भूमिका संशयास्पद?
काही गुत्तेदारांवर आधीच गुन्हे दाखल आहेत. तरीही त्यांचा मोकळा वावर सुरूच आहे. त्यांचे खासगी सुरक्षा रक्षक कमरेला पिस्तूल लटकवून फिरतात, याला पोलिसांची परवानगी आहे का? हा मुद्दा गंभीर आहे.
धाराशिव पोलीस काय भूमिका घेणार?
सध्या शेतकरी आणि नागरिक प्रशासनाकडे उत्तर मागत आहेत. तुळजापूर पोलीस ठाण्यात उघड शस्त्र प्रदर्शन सुरूच राहणार का? धाराशिव पोलिसांनी टू-वे अॅक्शन प्लॅन तयार करून कठोर कारवाई करावी, अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे.