राज्यातील सर्वात पुरातन त्रिविक्रम मंदिराला मिळणार गतवैभवजिर्णोद्धाराचे काम अंतिम टप्प्यात : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

राज्यातील सर्वात पुरातन त्रिविक्रम मंदिराला मिळणार गतवैभव

जिर्णोद्धाराचे काम अंतिम टप्प्यात : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Spread the love

धाराशिव प्रतिनिधी : राज्यातील सर्वात पुरातन मंदिर, अशी ख्याती असलेल्या चौथ्या शतकातील त्रिविक्रम मंदिराच्या जीर्णोद्धार, जतन आणि संवर्धनाचे काम सध्या वेगात सुरू आहे. मंदिरासमोरील सभामंडप पूर्णतः उकलून पुन्हा एकदा दीड हजार वर्षांपूर्वी होता, तसा साकारला जात आहे.  आपण सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे या कामासाठी 2 कोटी 90 लाखांचा निधी उपलब्ध होऊ शकला. त्रिविक्रम मंदिरासह तेर येथील संतश्रेष्ठ गोरोबा काका यांच्या समाधी मंदिरांसह राज्य संरक्षित स्मारक असलेल्या अन्य मंदिर आणि वास्तूंसाठी देखील मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून घेण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

वामन जयंतीच्या निमित्ताने त्रिविक्रम मंदिरात जाऊन आमदार पाटील यांनी दर्शन घेतले. तसेच सुरू असलेल्या मंदिर जिर्णोद्धाराच्या कामाची पाहणी केली. काम मुदतीत पूर्ण करण्याबाबत तसेच कामाचा दर्जा योग्य ठेवणेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या.

राज्य शासनाच्या पुरातत्व विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने त्रिविक्रम मंदिराच्या जतन व संवर्धन काम सध्या वेगात सुरू आहे. या कामामुळे तेरच्या विकासातही मोठी भर पडणार आहे. धाराशिव तालुक्यातील तेर येथे असलेले त्रिविक्रम मंदिर हे आजघडीचे राज्यातील सर्वात पुरातन मंदिर आहे. या मंदिराला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त व्हावे, यासाठी सन 2023 साली दोन कोटी 90 लाख रूपयांचा निधी आपण केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारने मंजूर केला होता. त्यानुसार प्रत्यक्षात पुरातन काळाचे साक्षीदार असलेल्या त्रिविक्रम मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे मंदिराच्या पुरातन सौंदर्यात भर पडणार आहे. अनेक इतिहास संशोधकांही सध्या येथे आवर्जून भेट देत असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.

याच मंदिराच्या सभामंडपात बाराव्या शतकात संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, मुक्ताई, सोपानदेव, निवृत्तीनाथ यांचे संतश्रेष्ठ गोरोबा काका यांच्या नेतृत्वाखाली पहिले संतसंमेलन झाले होते. त्रिविक्रम मंदिराच्या गर्भगृहासमोर सातव्या शतकातील लाकडी मंडप आहे. याच लाकडी मंडपात संतमेळा भरला होता. या गर्भगृहाला भेगा पडल्याने लाकडी मंडपाला पावसाळ्यात गळती लागली होती. त्यामुळे लाकडी मंडप कोसळण्याची भीती ग्रामस्थांसह भाविक व संशोधकांनी व्यक्त केली होती. त्याअनुषंगाने लाकडी सभामंडप बांधणे, गर्भगृह, गरूड मंदिर, मेंडेश्वर मंदिराची दुरूस्ती, प्रकाश योजना अशा विविध कामांसाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने 2 कोटी 90 लाखांचा निधी मंजूर केला. केवळ धाराशिव नव्हे, तर महाराष्ट्राच्या वैभवशाली वारशाची ऐतिहासिक ओळख असलेल्या दीड हजार वर्षांपूर्वीच्या या मंदिराला गतवैभव मिळवून देण्यासाठी महायुती सरकारने पुढाकार घेतल्यामुळे आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे धन्यवादही मानले. यावेळी श्री.पद्माकर फंड, उपसरपंच श्री. श्रीमंत फंड,  माजी सरपंच श्री. नवनाथ नाईकवाडी, श्री. विठ्ठल लामतुरे, श्री. अजित कदम, श्री. संजय धाकपाडे, श्री. अर्शद मुलाणी आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *