
धाराशिव जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई – सोन्याचे दागिने व चार मोटरसायकलसह दोन आरोपी ताब्यात
धाराशिव – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तुळजापूर येथील अपसिंगा रोडवर कारवाई करत दोन आरोपींना चोरीच्या सोन्याच्या दागिन्यांसह व चार चोरीच्या मोटरसायकलींसह ताब्यात घेतले. या कारवाईत एकूण 1.75 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे, पोह/327 जानराव, पोह/1003 समाधान वाघमारे, पोह/1479 जाधवर, पोना/1611 जाधवर, चालक पोह/1248 अरब, पोअं/693 दहीहंडे व पोअं/बोईनवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.
गुप्त माहितीच्या आधारे अपसिंगा रोड, तुळजापूर येथे चोरीचे दागिने व मोटरसायकल विक्रीसाठी दोन संशयित येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पथकाने तत्काळ त्या ठिकाणी धाव घेतली. धोंडीराम महादेव शिंगाडे (वय 42, रा. शिरताव, ता. मान, जि. सातारा) व अनिल हरिश्चंद्र माने (वय 33, रा. वासुदेव गल्ली, तुळजापूर) या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
चौकशीदरम्यान उघडकीस आले की, मोटरसायकली व सोन्याचे दागिने हे धाराशिव, सोलापूर ग्रामीण व सातारा जिल्ह्यांमधून चोरले गेले होते. जप्त मोटरसायकलींबाबत धाराशिव शहर, ढोकी, तुळजापूर, मोहळ (सोलापूर), म्हसवड (सातारा) पोलीस ठाण्यांमध्ये विविध कलमांखाली गुन्हे दाखल आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेच्या या यशस्वी कारवाईमुळे अनेक चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, फरारी आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.