
धाराशिव नगरपालिकेचा अजब खेळ!
ठेकेदार लाखो खाण्यात व्यस्त, नागरिक मात्र कचऱ्यात व्यस्त!
धाराशिव : शहरातील स्वच्छतेबाबत ठोस पावले उचलण्याऐवजी धाराशिव नगरपालिका आणि ठेकेदाराने मिळून स्वच्छतेचा संपूर्ण खेळ मांडला आहे. दरमहा कोट्यवधी रुपयांचा निधी ठेकेदाराला देण्यात येतो, पण प्रत्यक्षात शहरात स्वच्छतेचं शून्य चित्र पाहायला मिळत आहे.
ठेकेदाराच्या नावावर लाखो, कामगार मात्र गायब!
स्वच्छता व्यवस्थेसाठी असलेला ठेकेदार पुरेसा कामगारही ठेवत नाही. त्याऐवजी कागदोपत्री बोगस कामगार दाखवून नगरपालिकेला गंडा घालतो. अनेक भागात तब्बल आठ-आठ दिवस कचरा उचलला जात नाही, तोच कचरा रस्त्यांवर कुजतो, दुर्गंधी पसरते.
घंटागाड्या नाहीत, नागरिकांना पालिकेच्या आवारात कचरा टाकण्याची वेळ
सर्वात हास्यास्पद बाब म्हणजे, नगरपालिकेच्या आवारात उभ्या असलेल्या घंटागाड्यांमध्ये नागरिकांना स्वतः जाऊन कचरा टाकावा लागतो. कारण त्या गाड्या शहरात फिरकतातच नाहीत! हे चित्र म्हणजे प्रशासनाची थेट थट्टा आणि नागरिकांची प्रचंड अवहेलना आहे.
तक्रारी देऊनही ठेकेदार ‘बिलधारी’, कारवाई शून्य!
शहरातील नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या तरी प्रशासनाने ठेकेदारावर कारवाई केली नाही. उलट महिन्याला वेळेवर त्याचं बिल मंजूर केलं जातं! ही बाब गंभीर भ्रष्टाचाराची चाहूल देणारी असून, अधिकारी गप्प का?
ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करा – नागरिकांची एकमुखी मागणी
नागरिकांमध्ये यामुळे प्रचंड संताप असून, हा ठेकेदार तात्काळ ब्लॅक लिस्टमध्ये टाकावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे. तसेच या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून संबंधित नगरसेवक आणि अधिकाऱ्यांवरही कारवाई होणे आवश्यक आहे.