
बौद्ध समाजासाठी गावोगावी विहार व संस्कार केंद्रांसाठी निधीची मागणी – कैलास शिंदे यांची सामाजिक न्याय मंत्र्यांकडे मागणी
मुंबई : राज्यातील बौद्ध समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी गावागावांमध्ये बुद्ध विहार व संस्कार केंद्र उभारण्यासाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष कैलास शिंदे यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्याकडे केली.
मुंबई येथे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांची भेट घेऊन ही मागणी करण्यात आली. या वेळी धाराशिवचे विशाल सिंगाडे, सांगलीचे सिद्धार्थ माने, कोल्हापूरचे प्रमोद कदम आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.
राज्यातील बौद्ध समाजातील लहान मुले, महिला व युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी बौद्ध धम्माच्या शिकवणीवर आधारित संस्कार महत्त्वाचे आहेत. त्यामुळे प्रत्येक गावात बुद्ध विहार उभारण्यात यावा, जेणेकरून धम्म शिक्षण, शालेय विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची रुची, आणि समाज प्रबोधनाची संधी निर्माण होईल, अशी भूमिका या शिष्टमंडळाने मांडली.
या सकारात्मक मागणीची दखल घेत मंत्री संजय शिरसाठ यांनी सरकारकडून या मागणीकडे अनुकूल दृष्टिकोन ठेवून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती कैलास शिंदे यांनी दिली.