श्री तुळजाभवानी सैनिक शाळेतील भ्रष्टाचार व मारहाणीप्रकरणी चौकशी करा – शिवसेना तालुकाप्रमुख अमोल जाधव यांची मागणी

श्री तुळजाभवानी सैनिक शाळेतील भ्रष्टाचार व मारहाणीप्रकरणी चौकशी करा – शिवसेना तालुकाप्रमुख अमोल जाधव यांची मागणी

Spread the love



तुळजापूर – श्री तुळजाभवानी सैनिक शाळेमध्ये आर्थिक गैरव्यवहार आणि विद्यार्थ्यांवरील अमानुष मारहाणीच्या घटना घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल शिवाजीराव जाधव यांनी प्रशासनाकडे केली आहे.

श्री जाधव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून विविध वस्तू व सोयी-सुविधांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर – ३५,०००, १५,००० आणि ८,५०० रुपये – रक्कम वसूल करण्यात आली आहे. या वसुलीबाबत कोणतीही अधिकृत पावती देण्यात आलेली नाही, तसेच ती रक्कम शाळेच्या अधिकृत खात्यात जमा झाल्याचा पुरावा उपलब्ध नाही. काही पालकांनी प्रत्यक्षरित्या ही रक्कम दिल्याचे कबूल केले असल्याने हा गंभीर आर्थिक भ्रष्टाचार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

तसेच, शाळेत शिकणाऱ्या इयत्ता आठवीच्या एका विद्यार्थ्यावर शिक्षकाने बेदम मारहाण केल्याने तो बेशुद्ध पडल्याची घटना घडली असून, संबंधित पालकांनी यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, असे श्री जाधव यांनी स्पष्ट केले.

या दोन्ही प्रकारांची तातडीने व पारदर्शक चौकशी करण्यासाठी स्वतंत्र चौकशी समितीची स्थापना करावी व दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा, शिवसेना या अन्यायाविरोधात तीव्र आंदोलन छेडेल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीला प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

शिवसेनेच्या या मागणीनंतर पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्येही संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, लवकरात लवकर कारवाई न झाल्यास जनआंदोलन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *