
पोलीस निरीक्षक व महिला कर्मचाऱ्याला ९५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक
धाराशिव (प्रतिनिधी) – पोलीस निरीक्षकाने महिला कर्मचाऱ्याच्या मदतीने तक्रारदाराकडून लाच मागितल्याचा प्रकार समोर आला असून, आज २५ जून रोजी या प्रकरणात मोठी सापळा कारवाई पार पडली. तक्रारदार महिलेकडून मुलाच्या गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात १ लाख रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडीनंतर ९५ हजार रुपये देण्याचे ठरले होते.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर आज शासकीय पंचासमक्ष पोलिस निरीक्षक मारोती शेळके यांनी मुक्ता लोखंडे हिला भेटण्यास सांगितले. त्यानुसार धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहासमोर सापळा कारवाईचे नियोजन करण्यात आले. तक्रारदार महिलेकडून लोखंडे यांनी लाच स्वीकारताच त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. यावेळी पंचासमक्ष कारवाई करण्यात आली.
या कारवाईदरम्यान आरोपीच्या अंगझडतीत तीन मोबाईल, एक मोटारसायकल, चावी व ओळखपत्र मिळाले असून त्यांचे विश्लेषण सुरू आहे. या प्रकरणी भ्रष्ट्राचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ नुसार धाराशिव येथील आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे पोलीस खात्यातील भ्रष्टाचाराचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला असून नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.