
सारोळा (बु) जिल्हा परिषद केंद्रीय शाळेत बाल आनंद मेळावा आणि हळदीकुंकू सोहळा उत्साहात संपन्न
धाराशिव (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, सारोळा (बु) येथे “माझी शाळा – उपक्रमशील शाळा” या उपक्रमांतर्गत बाल आनंद मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला गावातील नागरिक, पालक, महिला, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य तसेच शारदा विद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच निर्मला चंदने होत्या. उपसरपंच वैभव पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नामदेव खरे, उपाध्यक्ष दीपक रणदिवे, ग्रामपंचायत सदस्य, युवा कार्यकर्ते, पदाधिकारी व क्रिकेटपटू यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली.
बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांसाठी 72 स्टॉल लावण्यात आले होते. यामुळे विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान, गणिती क्रिया व आर्थिक व्यवहारांची माहिती मिळाली. त्यांनी स्वतःच्या कष्टातून उत्पन्न मिळवण्याचा अनुभव घेतला.
हळदीकुंकू कार्यक्रमात गावातील महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. महिलांसाठी वाण लुटण्याचा व नाव घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी शाळेची शैक्षणिक गुणवत्ता आणि क्रीडा क्षेत्रातील भरारी यावर सखोल चर्चा झाली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांनी केले. हा उपक्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.



