पत्रकारांच्या पेन्शनसाठी लादलेल्या किचकट अटी शिथिल करा – चोरडिया शिर्डी येथील अधिवेशनास पत्रकारांनी उपस्थित रहावे

पत्रकारांच्या पेन्शनसाठी लादलेल्या किचकट अटी शिथिल करा – चोरडिया

शिर्डी येथील अधिवेशनास पत्रकारांनी उपस्थित रहावे

Spread the love



धाराशिव दि.७ (प्रतिनिधी) – पत्रकार सर्वसामान्यांच्या बातम्यांना शासन व प्रशासन दरबारी मांडून त्यांना न्याय देण्याचे काम करतो. मात्र पत्रकारांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो विशेष म्हणजे त्यांची आर्थिक बाजू सक्षम नसल्यामुळे त्यांचे आर्थिक स्त्रोत वाढला पाहिजे. तसेच ६० वर्षानंतर पत्रकारांना किमान व्यवस्थित जगता यावे यासाठी पेन्शन मिळणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी जाचक अटी लाद्या असून त्या अटी शिथिल करण्यात याव्यात अशी मागणी व्हाईस ऑफ मीडियाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष विजय चोरडिया यांनी दि.७ ऑगस्ट रोजी केली. दरम्यान शिर्डी येथे दि. ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर असे दोन दिवशीय होणाऱ्या पत्रकारांच्या अधिवेशनास सर्व पत्रकारांनी उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले.
व्हॉईस ऑफ मीडियाच्यावतीने अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे व्हाईस ऑफ मीडियाच्यावतीने अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.  या संदर्भात धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, मराठवाडा उपाध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, जिंतूर तालुकाध्यक्ष भागवत चव्हाण आदी उपस्थित होते. पुढे बोलताना चोरडिया म्हणाले की, पत्रकारांचे विशेषतः ग्रामीण भागातील पत्रकारांचे विविध प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रश्न प्रलंबित आहेत. ते प्रश्न व्हाईस ऑफ मीडियाने प्रशासन व शासन दरबारी मांडून त्यांची सोडवणूक करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला असल्याचे त्यांनी सांगितले.  सततच्या पाठपुराव्यामुळेच शासनाने पत्रकारांसाठी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली असून त्यासाठी दोन सदस्य अभ्यास समिती गठीत करण्यात आली आहे. या मंडळाच्या माध्यमातून पत्रकारांना छोटे मोठे उद्योग उभे करण्यासाठी अर्थसाह्य उपलब्ध करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पत्रकारांना कुठल्या प्रकारची सुरक्षा नसल्यामुळे ते असुरक्षित असून त्यांची राज्यस्तरावर पत्रकारांची १० लाख रुपयांची विमा पॉलिसी उतरविण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तर अधिस्विकृतीसाठी १० वर्ष पत्रकारिता केली असल्याचा अनुभव ग्राह्य धरून सरसकट पत्रकारांना अधिस्विकृती देण्यात यावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली. तसेच शंकरराव चव्हाण कल्याण निधीच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या पेन्शनच्या अटीमध्ये सलग ३० वर्षे एका दैनिकात काम करणे ही अट रद्द करावी व २० वर्ष पत्रकारितेची सेवा ग्राह्य धरावी असे त्यांनी सांगितले. यावेळी महानगराध्यक्ष मल्लिकार्जुन सोनवणे, धाराशिव तालुकाध्यक्ष अमजद सय्यद, आकाश नरोटे, डिजिटल विंगचे जिल्हाध्यक्ष वैभव पारवे, एज्युकेशन विंगचे जिल्हाध्यक्ष शितल वाघमारे, आकाश नरोटे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सलीम पठाण, जिल्हा कार्यवाहक कुंदन शिंदे, साप्ताहिक विंगचे जिल्हा उपाध्यक्ष जफरोद्दीन शेख, किशोर माळी, प्रमोद राऊत, रवींद्र लोमटे, संतोष वीर, बालाजी बिराजदार, निळकंठ कांबळे, अजित चंदनशिवे, किरण कांबळे, मुस्तफा पठाण, अजहर शेख, बळीराम कोकाटे, राजेश बिराजदार, अल्ताफ शेख आदींसह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *