
नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी यंत्रणांनी समन्वयातून काम करावे
निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव
मान्सून 2024 पूर्व तयारी आढावा सभा
धाराशिव – कोणतीही आपत्ती ही सांगून येत नाही.पावसाळ्याच्या दिवसात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीबाबत काही बाबतीत पूर्वकल्पना असते.त्यामुळे नुकसानीची तीव्रता आपण कमी करू शकतो.आपत्तीच्या काळात संकटात सापडलेल्या व्यक्तींना मदत करणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. पावसाळ्याच्या दिवसात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी यंत्रणांनी समन्वयातून काम करावे.असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी दिले.
आज 14 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित मान्सून 2024 पूर्वतयारी आढावा सभेत श्रीमती जाधव बोलत होत्या.यावेळी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नरसिंग मुंडे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बी.एम.थोरात,सार्वजनिक बांधकाम (विद्युत) कार्यकारी अभियंता सी.बी. चाकोते,सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव,उपविभागीय अधिकारी सर्वश्री संजय डव्हळे (धाराशिव),वैशाली पाटील(भूम),गणेश पवार (उमरगा),जिल्हा परिषदेचे जिल्हा जलसंधारण अधिकारी सी.आर.राऊळ, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पी.जी.राठोड,कार्यकारी अभियंता मदने, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.जी.एम. हुलसुरे,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेल्लोरे,पोलीस अधीक्षक कार्यालयातील जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक ए.आर.भुजबळ लघुपाटबंधारे कार्यकारी अभियंता एस.एस.आवटे,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्रीमती वाय.बी पुजारी,सीना कोरेगाव प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एस.जी.चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीमती जाधव पुढे म्हणाल्या,आपत्तीच्या काळात प्रत्येकाचे मोबाईल सुरू असले पाहिजे.संकटात सापडलेल्या व्यक्तीला तात्काळ प्रतिसाद द्यावा.मान्सूनपूर्व तयारीचा एक भाग म्हणून ज्या विभागांना त्यांचे नियंत्रण कक्ष सुरू करावयाचे आहे, त्यांनी आवश्यक त्या सुविधा व कर्मचाऱ्यांच्या सेवा घेऊन सुरू करण्याचे आतापासूनच नियोजन करावे. पावसाळ्याच्या दिवसात पाझर तलाव फुटणार नाही याची दक्षता घेऊन आतापासूनच त्यांच्या दुरुस्तीची कामे संबंधित विभागाने हाती घ्यावी.ज्या भागात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकांचे व घरांचे नुकसान होते तसेच पशु व मनुष्यहानी होते त्यांचे पंचनामे तात्काळ करावे.वरिष्ठ कार्यालयांना त्याचा अहवाल तत्परतेने सादर करावा म्हणजे नुकसानग्रस्तांना योग्य वेळेत मदत करता येईल.तालुका पातळीवर उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी तालुकास्तरीय यंत्रणाच्या सभा घेऊन यंत्रणांना मान्सून काळात सतर्क करावे असे त्या म्हणाल्या.
मान्सून काळात प्रत्येक गावाची जबाबदारी एका कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात यावी असे सांगून श्रीमती जाधव म्हणाल्या,ज्या गावांमध्ये आपत्तीमुळे नुकसान झाले आहे, त्याची कल्पना संबंधित तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना द्यावी. अतिवृष्टीमुळे गाव व शहरी भागात रोगराई पसरणार नाही यासाठी नगरपालिका व ग्रामीण क्षेत्रात नगरपालिका व ग्रामपंचायतीने पावसाळ्यापूर्वीच नालेसफाई करावी.शुद्ध पाण्याचा पुरवठा या काळात होईल या दृष्टीने काम करावे. शहरी व ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मान्सून काळात आपत्तीचा सामना करण्यासाठी सतर्क करावे. धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावावेत.असे श्रीमती जाधव यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीमती तेल्लोरे यांनी आपल्या सादरीकरणातून विविध विभागांवर सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या व कामाचे स्वरूप याबाबतची माहिती दिली.सभेला सर्व तहसीलदार, सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी तसेच संबंधित यंत्रणांचे प्रमुख व त्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.