अमोल जाधव यांची शिवसेना (शिंदे गट) तुळजापूर तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती;राजकीय वर्तुळात चर्चा रंगली

अमोल जाधव यांची शिवसेना (शिंदे गट) तुळजापूर तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती;राजकीय वर्तुळात चर्चा रंगली

Spread the love

तुळजापूर प्रतिनिधी) – तुळजापूर येथील शिवसैनिक अमोल जाधव यांची शिवसेना (शिंदे गट) तुळजापूर तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड पक्षाचे उपनेते व माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली. यावेळी चौगुले यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अमोल जाधव हे गेल्या काही काळात तुळजापूर तालुक्यातील राजकारणात ठळकपणे झळकलेले नाव ठरले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेल्या तुळजापूर यात्रा मैदान या मुद्द्यावर त्यांनी सातत्याने आवाज उठवला. या विषयावर त्यांनी आंदोलने, निवेदने, मोर्चे यांद्वारे लक्ष वेधले. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतः यात्रा मैदानाची पाहणी करून लवकरच यात्रा मैदान उभारले जाईल, असे आश्वासन दिले होते.

याशिवाय,अमोल जाधव यांनी तालुक्यातील विविध गैरव्यवहार, भ्रष्टाचाराचे प्रकरणे उघडकीस आणत प्रशासन आणि जनतेचे लक्ष वेधून घेतले. यामुळे ते सामाजिक आणि राजकीय पातळीवर अधिक सक्रीय झाले. त्यांच्या नेतृत्वात अनेक नव्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून, त्यांनी स्वतःची एक सशक्त कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली आहे.

त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेत पक्षप्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच पक्षाचे सचिव संजय मोरे व धाराशिव जिल्हा सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता शिवसेनेकडून तालुकास्तरावर ही मोठी नियुक्ती करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या नियुक्तीनंतर तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

अमोल जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “पक्षाने दिलेल्या जबाबदारीनुसार मी तालुक्यात शिवसेना अधिक बळकट करणार आहे. अनेक नवे कार्यकर्ते आणि पदाधिकारी लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असून, तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पक्षाच्या माध्यमातून मी कटिबद्ध आहे.”

यावेळी पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष मोहन पनुरे,उमरगा तालुकाध्यक्ष बळीराम सुरवसे,शेतकरी सेना तुळजापूर तालुकाध्यक्ष गणेश नेपते,तुळजापूर शहर उपाध्यक्ष रमेश चिवचिवे,चिम्मुभाई शेख तसेच अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सध्या संपूर्ण तालुक्याचे लक्ष अमोल जाधव यांच्या आगामी राजकीय वाटचालीकडे लागले असून, त्यांच्या नेतृत्वात तालुक्यात शिवसेनेचे कार्य कसे बहरते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *