
धाराशिवचे कामगार अधिकारी सुधाकर कोनाळे यांची बदली बीडला
धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव जिल्ह्याचे कामगार अधिकारी सुधाकर कोनाळे यांची बदली बीड जिल्ह्यात करण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांपासून त्यांनी धाराशिव येथे कामगार अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली होती. ही बदली प्रशासकीय कारणास्तव करण्यात आली असून, यासंदर्भातील अधिकृत आदेश उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाचे उपसचिव स्वप्नील कापडणीस यांनी नुकतेच जारी केले आहेत.
सुधाकर कोनाळे यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला आहे. त्यांच्या कार्यकाळात बांधकाम कामगार कार्यालयात विविध आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले. यामध्ये सर्वाधिक गाजलेला मध्यान्ह अन्न भोजन घोटाळा आणि कामगार किट घोटाळा विशेष चर्चेत राहिले. यामध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचा संशय आहे.
विशेषतः मध्यान्ह भोजन प्रकरणात सुमारे १०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. यासंदर्भात तत्कालीन जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांनी सखोल चौकशी करून ६७ कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आणला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत आमदार कैलास पाटील यांनी हे प्रकरण थेट विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून उपस्थित केले होते.त्यानंतर अधिकारी यांची चौकशी करण्याचे आदेश पण देण्यात आले होते.
या सर्व घटनांमुळे सुधाकर कोनाळे यांचा कार्यकाळ अनेक प्रश्नचिन्हांत अडकला असून, प्रशासनातील पारदर्शकतेबाबत गंभीर शंका निर्माण झाल्या होत्या. कामगार कार्यालयाशी संबंधित अनेक तक्रारींसह बांधकाम कामगारांच्या योजनांचा लाभ मिळवताना अडथळे निर्माण झाल्याची स्थानिक कामगार संघटनांची वारंवार तक्रार होती.
दरम्यान, आता धाराशिव येथे नवीन कामगार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. स्थानिक नागरिक आणि विविध कामगार संघटना नवीन अधिकाऱ्यांकडून पारदर्शक, कार्यक्षम आणि जनहितवादी प्रशासनाची अपेक्षा बाळगून आहेत. विशेषतः शासनाच्या विविध योजना, बांधकाम कामगार नोंदणी व सहाय्य यामध्ये गती येईल आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
धाराशिवच्या प्रशासनात बदलांची ही प्रक्रिया जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

