
घातक शस्त्रांसह आरोपी अटकेत; उमरगा उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची धडक कारवाई
उमरगा – उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे छत्रपती शिवाजी महाविद्यालय समोरील ड्रिम हाऊस कॅफेमध्ये छापा टाकण्यात आला. या कारवाईत गावठी पिस्तूल, जिवंत राऊंड्स, कोयते, सुरा आणि कारसह एकूण 2,53,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एक आरोपीला अटक करण्यात आली आहे.
गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून, कॅफेच्या वरच्या मजल्यावर एक काळा शर्ट घातलेला इसम पिस्तूलसह उपस्थित असल्याचे समजल्याने, उपविभागीय पोलीस अधिकारी उमरगा यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले व त्यांच्या पथकाला छाप्यासाठी पाठवले.
14:15 वाजता छापा टाकल्यानंतर संशयित इसम सुशील संतोष शहापुरे (रा. तुरोरी, ता. उमरगा, जि. धाराशिव) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 25,000/- रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि 4 जिवंत राऊंड, तर त्याच्या ताब्यातील कारमधून 6 कोयते, 1 सुरा (किंमत 3,500/- रुपये) मिळून आले.
याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गु.र.नं. 222/2025 अन्वये कलम 3/25, 4/25 शस्त्र अधिनियमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग कन्हेरे हे पुढील तपास करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी उमरगा सदाशिव शेलार यांच्या नेतृत्वाखाली पो.नि. अश्विनी भोसले, पोउपनि अनुसया माने, पोहेकॉ संतोष बोयणे, पोहेकॉ संतोष सोनवणे, पोना महेश अवचार, पोकॉ शिवराज थोरे, पोकॉ आनंद कांबळे, पोकॉ बालाजी जाधव यांनी केली आहे.