तुळजापूर ड्रग्ज रॅकेट प्रकरणावरून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आक्रमक; वादग्रस्त डीवायएसपी निलेश देशमुख यांची मुदतवाढ रद्द करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

तुळजापूर ड्रग्ज रॅकेट प्रकरणावरून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आक्रमक; वादग्रस्त डीवायएसपी निलेश देशमुख यांची मुदतवाढ रद्द करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Spread the love

धाराशिव – तुळजापूर शहरातील गाजत असलेल्या ड्रग्ज रॅकेट प्रकरणात पोलिसांची कारवाई केवळ दिखाऊ असून मुख्य सूत्रधार अजूनही मोकाट आहेत, असा आरोप करत धाराशिवचे खासदार ओमप्रकाश  राजेनिंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी वादग्रस्त पोलीस उपअधीक्षक निलेश देशमुख यांना दिलेल्या मुदतवाढीवर तीव्र आक्षेप घेत, तातडीने बदलीची मागणी केली आहे.

राजेनिंबाळकर यांनी मुख्यमंत्र्यांना ९ सप्टेंबर रोजी पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तुळजापूरमधील ड्रग्ज रॅकेटमधील अनेक आरोपींना जामीन मिळाल्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. विशेष म्हणजे, या आरोपींपैकी एका व्यक्तीचा राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर सत्कार केल्याचेही त्यांनी उघड केले आहे.

“लांडग्याच्या हाती कोकराचे रक्षण” – ओमराजेंचा संताप
तुळजापूरमधील ड्रग्जचा सुळसुळाट ज्या अधिकाऱ्याच्या कार्यकाळात झाला, त्याच डीवायएसपी निलेश देशमुख यांना बदली न करता एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली, याबद्दल राजेनिंबाळकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. “ज्याच्या कार्यक्षमतेवर गंभीर शंका आहे, अशा अधिकाऱ्यालाच बक्षीस दिले जात आहे. ही बाब सरकारच्या नीयतवर प्रश्नचिन्ह निर्माण करते,” असे मत त्यांनी व्यक्त केले. राजेनिंबाळकर पुढे म्हणाले, “या अधिकाऱ्याकडेच तपास ठेवणे म्हणजे लांडग्याच्या हाती कोकराचे रक्षण देण्यासारखे आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळातील कारभारावर विश्वास ठेवता येत नाही.”

मुख्यमंत्र्यांकडे चार प्रमुख मागण्या
ड्रग्ज रॅकेटमधील सर्व मुख्य आरोपींना तातडीने अटक करून मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करावी.आरोपीचा सत्कार करणाऱ्या मंत्र्यांविरोधात नैतिक जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात यावी.डीवायएसपी निलेश देशमुख यांना दिलेली मुदतवाढ तातडीने रद्द करून त्यांची बदली करावी.
संपूर्ण प्रकरणाचा तपास स्वतंत्र आणि उच्चस्तरीय यंत्रणेकडे सोपवावा.

राजकीय भेद विसरून या गंभीर प्रकरणात कठोर आणि निःपक्ष कारवाई करण्यात यावी, अशी स्पष्ट मागणी खासदार ओमराजे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या पत्रामुळे तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचा राजकीय आणि प्रशासनिक गुंता आणखी गडद झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *