कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या कोट्यवधी भाविकांसाठी आपल्या महायुती सरकारने गोड बातमी दिली आहे. तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी भूसंपादनाच्या कामासाठी १८ कोटी ८९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष यांच्याकडे निधी वितरित करण्याबाबत शासन आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या कामाचा प्रत्यक्ष श्रीगणेशा आता लवकरच होणार असल्याच्या विश्वास मंदिर समितीचे विश्वस्त तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.
कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र तुळजापूर विकास आराखड्यावर राज्य सरकारने यापूर्वीच मोहर उमटवलेली आहे. त्यासाठी १,८६५ कोटी रुपयांचा निधीही मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने मंजूर केला आहे. या विकास अनुषंगानेच नियोजन विभागाकडून भूसंपादन प्रक्रिया तातडीने राबविण्यासाठी मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे निधी वितरित करण्याबाबत शासन आदेश निर्गमित करण्यात आला आहे. त्यामुळे तुळजापूरकर आणि तुळजाभवानी मातेच्या कोट्यावधी भाविकांना गोड बातमी मिळाली आहे. १८ कोटी ८९ लाख रुपयांच्या निधीद्वारे चालू आर्थिक वर्षापासूनच भूसंपादन कामाची अंमलबजावणीही सुरू होणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. राज्य शासनाच्या नियोजन विभागाने शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या कामाला आता गती मिळणार आहे. या आराखड्यांतर्गत मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये मुख्य दर्शन मंडप व तेथील अनुषंगिक सुविधा,श्री तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार देतानाचा १०८ फुटाचा पुतळा, घाटशिळ, महामार्गाजवळील सोलापूर बायपास पट्टयामध्ये व हडको येथे भक्तनिवास, प्रसादालय,पुस्तकालय, भोजनालय, भाविक सुविधा केंद्र,वाहनतळ तयार करणे.वृंदावन गार्डनप्रमाणे आधुनिक उद्यान, वृध्द व दिव्यांगाकरिता लिफ्ट, ट्रॅव्हलेटर आदी बाबींचा अंतर्भाव करण्यात आला आहे. चौंडी येथे पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या विशेष बैठकीत मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास अंतिम मान्यता देण्यात आली होती. जिल्हाधिकारी धाराशिव यांना त्यासाठी “संनियंत्रण अधिकारी” म्हणून घोषित करण्यात आले आहे. संपूर्ण प्रकल्प वेळेत आणि पारदर्शकपणे पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
तुळजापूर आणि परिसराचा कायापालट करण्याची क्षमता असलेल्या या महत्वपूर्ण प्रकल्पांतर्गत १०० कोटींपेक्षा अधिक किंमतीचा श्री तुळजाभवानी माता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा १०८ फूट उंचीचा पुतळा, ८० कोटींचा रामदरा तलाव सौंदर्यीकरण, ९८ कोटींचे बहुस्तरीय पार्किंग सुविधा केंद्र, तसेच हजारो चौ.मी. क्षेत्रात पायाभूत सुविधांचा समावेश असणार असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले आहे. तुळजाभवानी देवीजींचे तीर्थक्षेत्र जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचा दृष्टीने या आराखड्यातील सर्व कामे पुढील तीन वर्षांत म्हणजेच २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच प्राचीन वास्तूंची ऐतिहासिकता अबाधित राखून पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखालीच ही सर्व कामे पार पाडण्यात येणार आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तुळजापूर हे राज्यातील एक महत्त्वाचे धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून अधिक प्रभावीपणे विकसित होणार असल्याचा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.
भूसंपादनासाठी प्रचलित दराच्या कैकपट मावेजा
तुळजापूर शहरातील नागरिक आणि पुजारी बांधवांना विश्वासात घेऊन भूसंपादन प्रक्रिया राबवली जाणार आहे. प्रचलित दाराच्या कैकपटीने विकास आराखड्यासाठी भूसंपादन केले जाणार आहे. त्यासाठी सादर करण्यात आलेल्या या विकास आराखड्यात एकूण प्रकल्प किमतीच्या ३०% तरतुद केवळ भूसंपादन प्रक्रियेसाठी करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांची जागा तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या विकासासाठी संपादित केली जाणार आहे त्यांना समाधानकारक मावेजा मिळणार आहे. सर्वांच्या सहमतीने आणि सर्वांना विश्वासात घेऊनच, जमिनीचा चांगला मोबदला देण्यात येणार असून आई तुळजाभवानी मातेच्या तीर्थक्षेत्र जागतिक दर्जाचे करण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.