विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क सरसकट माफ करावे – अभाविपची मागणी
उमरगा | यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांबरोबरच विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांचेही मोठे नुकसान झाले असून, अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने घरे, शाळा, महाविद्यालये, शेती आणि जीवनावश्यक वस्तूंचा नाश झाला आहे.
या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) उमरगा शाखेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांच्या मार्फत ईमेलद्वारे पाठविण्यात आले.
अभाविपने आपल्या निवेदनात विद्यार्थ्यांसाठी आणि पूरग्रस्त कुटुंबांसाठी पुढील महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत:
पूरग्रस्त शाळा-महाविद्यालयांचे नुकसान भरून काढून विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तके विनामूल्य द्यावीत.
अतिवृष्टीग्रस्त क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क संपूर्ण माफ करावे.
परीक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांसाठी फेर परीक्षा आयोजित कराव्यात.
स्पर्धा परीक्षा फॉर्म शुल्क माफ करून सरसकट फॉर्म भरण्याची सुविधा द्यावी.
“कमवा व शिका” योजनेचा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा.
नष्ट झालेली शैक्षणिक कागदपत्रे विनाशुल्क पुन्हा उपलब्ध करून द्यावीत.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी.
पूरग्रस्त भागांमध्ये आरोग्य सुविधा, औषधे, स्वच्छता मोहीम उपलब्ध करून द्यावी.
अन्नटंचाई असलेल्या भागात तात्काळ अन्न पुरवठा करावा.
अभाविप कार्यकर्त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि पुरग्रस्त कुटुंबांना दिलासा मिळावा यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा.
या निवेदनावेळी तालुका संयोजक अभिषेक मिसाळ, प्रणित जांभळे, ओंकार चव्हाण, चैतन्य जाधव, आसिफ अत्तर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
