बांधकाम कामगार कार्यालयाचा गजब प्रकार — कामगारांना गृह उपयोगी साहित्यासाठी बोलावलं पण गोडाऊनच बंद!
धाराशिव जिल्हा बांधकाम कामगार कार्यालयाचा गजब प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना गृह उपयोगी साहित्य वितरणासाठी बोलावण्यात आले होते, मात्र कामगार ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्यावर गोडाऊनच बंद असल्याचे चित्र दिसून आले. या प्रकारामुळे शेकडो बांधकाम कामगारांनी संताप व्यक्त केला.
धाराशिव जिल्ह्यातील बांधकाम कामगार कल्याण कार्यालयामार्फत विविध योजना राबवल्या जातात. त्यामध्ये बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू देण्याचीही योजना आहे. यासाठी कामगारांना ऑनलाईन नोंदणी करून विशिष्ट तारीख देण्यात येते. त्या तारखेला त्यांना वस्तू वाटपासाठी बोलावले जाते.
मात्र 7 ऑक्टोबर रोजी ऑनलाईन तारीख मिळाल्यानुसार जिल्ह्यातील अनेक कामगार कळंब येथे पोहोचले. परंतु ठरलेल्या ठिकाणी गोडाऊन बंद असल्याने कामगार ताटकळत बसले. या सर्व प्रकारामुळे कामगारांमध्ये तीव्र नाराजी होती. “आजचा रोजगार गेला, उद्याचाही रोजगार बुडवावा लागेल,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
सदर ठिकाणी कोणताही बांधकाम कार्यालयाचा कर्मचारी उपस्थित नव्हता. काही कामगार धाराशिव, उमरगा, वाशी, भूम, परंडा अशा दूरच्या भागातून आले होते. या सर्वांना गोडाऊन बंद असल्याने परतावे लागले.
दरम्यान, काही बांधकाम कामगारांच्या नावावर गृह उपयोगी वस्तू परस्पर उचलल्याचा प्रकार देखील समोर आला असून, संबंधित कामगारांनी बांधकाम कामगार कार्यालयाकडे तक्रार दाखल केली आहे.
धाराशिव जिल्हा बांधकाम कामगार अधिकारी सुधाकर कोनाळे यांच्यावर या सर्व प्रकारात दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे. सध्या त्यांचा चार्ज बीड येथे असून, धाराशिव कार्यालयाकडे त्यांचे दुर्लक्ष असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. या योजनेमध्ये अनेक एजंट सक्रिय असून, खऱ्या बांधकाम कामगारापर्यंत लाभ पोहोचत नसल्याचे दिसून येत आहे.
बांधकाम कार्यालयाचा कारभार प्रामुख्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अवलंबून असून, कोनाळे हे धाराशिवला हजेरी लावत नाहीत असा आरोप देखील वारंवार केला जात आहे.
मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या दिशा समितीच्या ैठकीत आमदार कैलास पाटील यांनी बांधकाम कामगार कार्यालयाच्या कामकाजावर तीव्र शब्दांत टीका केली होती. त्यांनी या बैठकीत कार्यालयाचे लॉगिन आयडी एजंटकडे असल्याचा धक्कादायक आरोप केला होता.कामगारांनी या सर्व प्रकाराची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणावर स्वतंत्र जनरल मजूर कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद भालेराव यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की,
कामगार मंडळाच्या नियमानुसार प्रत्येक तालुक्यात भांडी वाटप झाले पाहिजे, परंतु धाराशिव जिल्ह्यात फक्त कळंब येथेच वाटप सुरु आहे. संबंधित कॉन्ट्रॅक्टरशी संपर्क साधल्यावर त्यांनी ‘धाराशिव खूप लांब आहे, आम्हाला 300 किलोमीटरवरून यावे लागते’ असे सांगितले. स्वतंत्र जनरल मजूर कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष आनंद भालेराव
या प्रकारामुळे कामगारांमध्ये तीव्र नाराजी असून, शासनाने तात्काळ चौकशी करून कामगारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे.


