अंबेजवळगा मतदारसंघात नवे समीकरण! — योगिता शिंदे यांचं नाव अग्रस्थानी, स्थानिकांमध्ये चर्चेला वेग
धाराशिव जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीनंतर अंबेजवळगा जिल्हा परिषद मतदारसंघात नव्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. या मतदारसंघात स्थानिक उमेदवारांना संधी द्यावी, अशी जनतेतून जोरदार मागणी होत असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील राजकारण चांगलेच रंगत आहे.
या चर्चेत शिंगोली ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच योगिता राहुल शिंदे यांचे नाव आघाडीवर असल्याचे दिसत आहे. मागील तीन वर्षांत ग्रामविकास, स्वच्छता अभियान, महिला बचतगट बळकटीकरण आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये त्यांनी बजावलेली सक्रिय भूमिका उल्लेखनीय ठरली आहे. त्यांच्या कामातून निर्माण झालेली विश्वासार्ह प्रतिमा आणि सर्वसमावेशक दृष्टीकोनामुळे त्या “सशक्त महिला नेतृत्वाचे प्रतीक” म्हणून ओळखल्या जात आहे
योगिता शिंदे या शिंगोलीचे माजी सरपंच हरिश्चंद्र शामराव शिंदे यांच्या नात सून असून, भाजप युवा मोर्चाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष राहुल भैया शिंदे यांच्या पत्नी आहेत. राहुल शिंदे यांनी गेल्या काही वर्षांत अंबेजवळगा परिसरात सामाजिक, शैक्षणिक आणि युवक वर्गाशी निगडित विविध उपक्रमांतून सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे आणि जनसंपर्कामुळे मतदारसंघात त्यांचा प्रभाव सातत्याने वाढत चालला आहे.
स्थानिक नागरिकांमध्ये अशी भावना व्यक्त होत आहे की, “डॉ. पाटील कुटुंबाप्रती शिंदे कुटुंबाची तीन पिढ्यांची निष्ठा आणि सातत्यपूर्ण कार्य” हेच या वेळी त्यांच्या दावेदारीसाठी मजबूत आधार ठरू शकतात.
महिला सक्षमीकरण, ग्रामस्वच्छता, शिक्षणवृद्धी आणि युवक संघटन यांसारख्या क्षेत्रात सातत्यपूर्ण काम केल्याने शिंदे दांपत्याविषयी मतदारसंघात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अंबेजवळगा जिल्हा परिषद मतदारसंघातून सौ. योगिता शिंदे यांची दावेदारी प्रबळ मानली जात असून, स्थानिकांच्या अपेक्षा आता त्यांच्या दिशेने वळताना स्पष्ट दिसत आहेत.
“सामाजिक, शैक्षणिक आणि सर्वसामान्यांच्या हिताचे कार्य हाच आमचा ध्यास आहे,” असे सौ. योगिता शिंदे यांनी संवादात सांगितले.
अंबेजवळगा मतदारसंघातील वाढत्या चर्चांमुळे राजकीय समीकरणांना नव्या दिशेची चाहूल लागली असून, पुढील काही दिवसांत स्थानिक राजकारणात मोठे बदल घडू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
