मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त सारोळा बु शाळेत ध्वजारोहण व आदर्श शिक्षकांचा सत्कार समारंभ
धाराशिव (प्रतिनिधी) – मराठवाडा मुक्ती दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, सारोळा बुद्रुक येथे ध्वजारोहण आणि आदर्श शिक्षक सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नामदेव आप्पा खरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गावच्या प्रथम नागरिक सरपंच निर्मलाताई चंदने, उपसरपंच वैभव पाटील, माजी सरपंच प्रशांत तात्या रणदिवे, उपाध्यक्ष दीपक रणदिवे, माजी उपसरपंच सावन देवगिरे, उद्योजक अमर बाप्पा बाकले, पोलीस पाटील प्रीतम कुदळे, केंद्रप्रमुख तानाजी वनकळस, ग्रामपंचायत सदस्य मिलिंद कटारे, नितीन चंदने यांच्यासह पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
“शाळेला गावाचा आधार, गावाला शाळेचा अभिमान” या उक्तीप्रमाणे शाळेने गेल्या काही वर्षांत शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासात उल्लेखनीय प्रगती केली आहे. शिष्यवृत्ती, आय एम विनर परीक्षा, वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक सहल आणि जादा तासिकांच्या नियोजनामुळे शाळेचा आलेख चढता आहे. या यशाचे खरे शिल्पकार असलेल्या शिक्षकांचा शाळा व्यवस्थापन समितीने ट्रॉफी, प्रमाणपत्र, फेटा, बुके आणि पुष्पहार देऊन आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान केला. यात मुख्याध्यापक तानाजी वनकळस यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी शाळेतून निरोपित झालेले शिक्षक अजय पाटील, सौ. सारिका मस्के आणि सौ. अलका कानडे यांचा निरोप समारंभही आयोजित करण्यात आला. त्यांनी शाळेसाठी दिलेले योगदान अविस्मरणीय असल्याचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापकांनी नमूद केले. या तिघांनाही आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच, ध्येय प्रकाशन अकॅडमी, पुणे यांच्याकडून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेले शिक्षक विशाल सूर्यवंशी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. याशिवाय नानासाहेब सावंत, राजेंद्र सूर्यवंशी, पांडुरंग शेषणी, राजेंद्र अंगरखे, अनिता सूर्यवंशी, सुनिता वडगावकर आणि सुमित्रा आटपलकर यांनाही आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.
शाळेने सलग चार वर्षे शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थी पात्र ठरवले आणि आय एम विनर परीक्षेत जिल्हा व तालुका पातळीवर क्रमांक मिळवल्याबद्दल सर्व शिक्षकांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. तसेच, प्रशिक्षणार्थी कोमल इंगळे आणि राजश्री गाढवे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात प्रशांत तात्या रणदिवे, वैभव पाटील, सावन देवगिरे आणि नामदेव आप्पा खरे यांनी शाळेच्या गुणवत्तेबरोबरच भौतिक सुविधांमधील अडचणींवरही प्रकाश टाकला. हा कार्यक्रम शाळेच्या प्रगतीचा आणि गाव-शाळा एकतेचा उत्सव ठरला.


