कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प,रामदारा ते एकुरका कामासही शासनाची मंजुरीसात हजार हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली : आमदार राणाजगजितसिंह पाटील

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प,रामदारा ते एकुरका कामासही शासनाची मंजुरी

सात हजार हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली : आमदार राणाजगजितसिंह पाटील

Spread the love

कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या योजना क्रमांक दोनमधील टप्पा क्रमांक १ ते ५ चे काम पूर्ण होत आले आहे.   आता रामदारा ते एकुरका या टप्पा क्रमांक ६ च्या कामासही शासनाने मंजुरी दिली आहे.  जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपल्या मागणीवरून प्राधान्यक्रमात  टप्पा क्रमांक ६ चा समावेश केला आहे. त्यामुळे तुळजापूर, उमरगा आणि लोहारा या तीन तालुक्यात पाणी वितरणाची व्यवस्था निर्माण झाल्यावर सुमारे ७ हजाराहून अधिक हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. मराठवाड्याच्या न्याय हक्काच्या ७ टीएमसी पाण्यापैकी २.२४ ‘टीएमसी’ पाणी या तीन तालुक्यात खळाळणार असल्याची माहिती मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

राज्याचे जलसंपदा मंत्री ना. श्री. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या कामाचा शुभारंभ मागील महिन्यात करण्यात आला. त्यावेळी टप्पा क्रमांक सहा मधील कामांचा समावेश प्राधान्यक्रमात घेण्यात यावा अशी मागणी आपण मंत्री ना. विखे पाटील साहेब यांच्याकडे केली होती. त्याला आता मान्यता मिळाली आहे. त्यामुळे तुळजापूर तालुक्यातील १५, उमरगा तालुक्यातील १४ व लोहारा तालुक्यातील ६ अशा एकूण ३५ गावांतील सात हजारहून अधिक हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या योजनेअंतर्गत रामदारा तलावातून ८५ किलोमीटर बंद कालव्याद्वारे कृष्णेचे पाणी सध्या अस्तित्वात असलेल्या तीन मध्यम प्रकल्प, पाच साठवण तलाव आणि नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या दोन बॅरेजेस जोड कालव्याद्वारे एकूण दहा साठवण तलावांमध्ये भरण्यात येणार आहे. त्यातून या भागातील ३५ गावाच्या सिंचनाची सोय होणार आहे. या टप्प्यासाठी अंदाजे रुपये ४२० कोटी खर्च अपेक्षित असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

धाराशिव जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे विशेष लक्ष असून त्यांच्या सहकार्यामुळे  ११,७०० कोटी रुपयांच्या कामांना महायुती सरकारने सुधारित प्रशासकीय मान्यता दिली व वेळोवेळी आवश्यक निधीची उपलब्धता करून दिली त्यानंतरच या कामांना गती मिळाली. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या योजना क्रमांक २ मधून टप्पा क्र. १ ते ५ चे काम अंतिम टप्प्यात आहे. कृष्णेचे २१ टीएमसी पाणी मराठवाड्याच्या न्याय हक्काचे आहे. त्यापैकी ७ टीएमसी पाण्यासाठी सध्या कामे सुरू आहेत. त्यापैकी २.२४ टीएमसी पाणी उपसा योजना क्रमांक दोनमधून तुळजापूर, उमरगा, लोहारा तालुक्यात आणण्यासाठी युद्ध पातळीवर कामे सुरू आहेत. सध्या ऊर्ध्व नलिका व जोड कालव्यांची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामेही प्रगतिपथावर आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहळ तालुक्यातील घाटणे बॅरेजच्या भोयरे पंप हाउसमधून तुळजाभवानी मातेच्या चरणी असलेल्या रामदरा तलावात पाणी लवकरच येणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.



चौकट



१७ किलोमीटर पाइपलाइन

उपसा सिंचन योजनेतील सहा पैकी चार प्रकल्पांतून १७ किलोमीटर पाइपलाइनद्वारे पाणी वाहून आणण्यात येणार आहे. यासाठी २५०० एमएम व्यासाचा व १५ एमएम जाडीच्या पत्र्याचा पाइप वापरला आहे. तसेच, ४६ किमी लांबीचा कालवाही आहे. पाइपलाइन आणि कालव्याच्या माध्यमातून ६३ किलोमीटर अंतर कापून हे पाणी तुळजाभवानी मातेच्या चरणी रामदरा तलावामध्ये दाखल होईल. यासाठी चार जोड कालवे असून सहा पंप हाउस आहेत. त्यापैकी पाच पंप हाउसचे काम पूर्ण झाले आहे.



कृष्णेच्या पाण्यासाठी ६ टप्प्यांत होणार कामे

सिंचन प्रकल्प क्र. २ चे काम ६ टप्प्यांत होत आहे. यामध्ये प्रकल्प टप्पा क्र. १ घाटणे, प्रकल्प टप्पा क्र. २ पडसाळी, प्रकल्प टप्पा क्र. ३ सावररगाव, प्रकल्प टप्पा क्र. ४ पांगरदरवाडी, प्रकल्प टप्पा क्र. ५ सिंदफळ, तर रामदरा प्रकल्प टप्पा क्रमांक ६ मध्ये येतो, म्हणजेच पाच टप्पे पूर्ण करून पाणी रामदरा तलावामध्ये दाखल होईल. प्रत्येक टप्प्यावर स्वतंत्र पंप हाउसची उभारणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *