सही न केलेला माफीनामा, जिल्हा प्रशासनाकडून पुन्हा एकदा शेतकऱ्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न
धाराशिव – जिल्हाधिकारी व निवासी उप जिल्हाधिकारी यांचा सोशल मीडियावर नाच करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून प्रेस नोट काढण्यात आली प्रशासनाने पूरग्रस्त शेतकऱ्यांबाबत दिलगिरी व्यक्त करणारी एक प्रेस नोट जाहीर केली. मात्र या प्रेस नोटमुळेच नवीन वादळ उठले आहे. कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्याची यात सही नाही. ज्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला त्या जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांची एव्हाना ज्या माय बाप जनतेच्या कराच्या पैशातून त्यांचे वेतन होते त्यांची दिलगिरी व्यक्त करताना खाली सही करावी वाटत नाही हे खेदजनक आहे.
समाजसेवक मनोज जाधव यांनी या प्रेस नोटवर जोरदार हल्लाबोल केला असून, “ही नोट अधिकृत आहे की दिशाभूल करण्यासाठी तयार करण्यात आली आहे?” असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.
जाधव म्हणाले की, या प्रेस नोटमध्ये कोणत्याही अधिकाऱ्याचे नाव नाही, जिल्हाधिकारी कार्यालयाचा लेटरपॅड नाही, तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या नाहीत. अशा परिस्थितीत ही नोट अधिकृत मानायची कशी? प्रशासनाने ही भूमिका घेत शेतकऱ्यांची थेट दिशाभूल केली असल्याची टीका त्यांनी केली.
याचबरोबर जाधव यांनी प्रशासनास ठाम इशारा दिला की,
“तुम्ही अधिकृत प्रेस नोट जाहीर करा किंवा प्रसारमाध्यमांसमोर येऊन शेतकऱ्यांची माफी मागा. अन्यथा मी माझ्या आंदोलनावर ठाम राहीन व कोणत्याही क्षणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडेन.”
पूरग्रस्त शेतकरी आधीच संकटातून जात असताना, प्रशासनाचे हे हलगर्जीपण व चुकीची भूमिका धक्कादायक असल्याचे ते म्हणाले.
माफी मागणे म्हणजे स्वतः केलेल्या चुकांची कबुली देऊन ती क्षमा करण्याची विनंती करणे.
यात आपली चूक मान्य केली जाते आणि समोरच्या व्यक्तीकडून क्षमा मागितली जाते.
दिलगिरी व्यक्त करणे म्हणजे काही अयोग्य, दुःखद किंवा नकोसे घडले याबद्दल खंत आणि सहानुभूती व्यक्त करणे.
यात नेहमीच स्वतःची चूक असतेच असे नाही; कधी कधी परिस्थितीमुळे झालेल्या त्रासाबद्दलही दिलगिरी व्यक्त केली जाते.
सध्या जिल्ह्यातील वातावरण तापले असून, प्रशासनाची कारवाई काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. समाजसेवक मनोज जाधव यांचा लढाऊ इशारा आता प्रशासनाला हादरवणारा ठरणार का? हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
