मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यू पावलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देणार
परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक
मुंबई : संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन लाभत होते. या आंदोलनात सहभाग घेण्यासाठी मुंबईकडे जात असताना दुर्दैवी अपघातात पाच मराठा बांधवांचा मृत्यू झाला.
मृतांमध्ये सतीश देशमुख (रा.वरंगाव, ता. काज,जि.बीड), विजय चंद्रकांत धोगरे (रा.टाकळगाव,ता.अहमदपूर, जि.लातूर),अतुल खवचट (रा. केसापुरी,ता.बीड,जि. बीड), गोपीनाथ जाधव (रा.बोराळा,ता. वसमत,जि.हिंगोली) आणि भारत यादव खससोडे (रा.आहेर वडगाव, ता.बीड,जि.बीड) यांचा समावेश आहे.
या दुःखद प्रसंगी परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी संवेदनशील निर्णय घेतला असून मृत आंदोलनकर्त्यांच्या प्रत्येक कुटुंबाला स्वखर्चातून ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.ही मदत संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते संबंधित कुटुंबियांना प्रदान करण्यात येणार आहे.या निर्णयामुळे मृतांच्या कुटुंबियांना दिलासा मिळेल,अशी प्रतिक्रिया मराठा समाजातून उमटली आहे.
