वक्फ मंडळाच्या जमिनीवरील अतिक्रमणे काढून नियमानुसार केलेल्या बांधकामांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात – राज्य वक्फ मंडळ अध्यक्ष समीर  काझी

वक्फ मंडळाच्या जमिनीवरील अतिक्रमणे काढून नियमानुसार केलेल्या बांधकामांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात – राज्य वक्फ मंडळ अध्यक्ष समीर  काझी

Spread the love



धाराशिव (प्रतिनिधी) – वक्फ मंडळाच्या शहरी भागातील जमिनीवर अतिक्रमणे करण्यात आली आहे.धाराशिव शहरातही हे दिसून येत आहे.वक्फ मंडळाच्या जमिनीवर जे अतिक्रमण केले आहे,त्यावर नियमानुसार कारवाई करून अतिक्रमण काढण्यात येतील आणि ज्या जमिनीवर नियमानुसार बांधकाम झाले आहे त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. असे निर्देश महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी यांनी दिले.

वक्फ मंडळाच्या जमिनीवरील अतिक्रमण व महसुली अभिलेखातील नोंदीबाबत काझी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक घेतली,यावेळी ते बोलत होते.या बैठकीला जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, अपर जिल्हाधिकारी श्रीमती ज्योती पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती शोभा जाधव, उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, अरुणा गायकवाड उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख,संजय पाटील,जिल्हा वक्फ अधिकारी सय्यद आमेर,सर्व तहसीलदार व सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी आदींची उपस्थिती होती.

काझी म्हणाले की,विविध विभागाशी संबंधित असलेल्या वक्फ मंडळाच्या अडचणी दूर व्हाव्यात हा या बैठकीचा उद्देश आहे.वक्फ मंडळाच्या जमिनीवर बांधकामाची परवानगी मागितली तर नियमानुसार परवानगी देण्यात येते.काही ठिकाणी शासकीय कार्यालये ही वक्फ मंडळाच्या जमिनीवर आहे.त्याबाबत शासनाशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.वक्फ मंडळाच्या जमिनीवर कोणी अतिक्रमण करत असतील, जबरदस्तीने त्या जमिनी ताब्यात घेत असतील तर योग्य ती कारवाई करण्यात येईल व संबंधिताविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येईल.असे काझी यांनी सांगितले.

वक्फ बोर्डाच्या जमिनीची नोंद सातबारावर घेण्यात येईल व बोर्डच्या अनुषंगाने महसूल विभाग सहकार्य करणार असल्याचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जिल्हा वक्फ अधिकारी श्री.आमेर यांनी नवीन वक्फ अधिनियम या अंतर्गत वक्फ मालमत्तांचे सर्वेक्षण,मालमत्तांचे फेरफार नोंदी घेणेबाबत,वक्फ मंडळाचे निर्देश व नवीन वक्फ मालमत्तांची नोंदणी,वक्फ मालमत्ता अवैध हस्तांतरणबाबत, व्यवस्थापनाचा ताबा हस्तांतरित करणे,वक्फ मालमत्तांच्या भूसंपादनाबाबत,महसूल विभागाच्या १३ एप्रिल २०१६ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करणे, वक्फ जमिनीचे भूसंपादन,वक्फ जमिनीवरील अतिक्रमणाबाबत उम्मीद कायदा १९९५ च्या कलम ५४ अंतर्गत अतिक्रमण काढणे,वक्फ जमीन खालसा,वक्फ मालमत्ता नसल्याचे ना हरकत,वक्फ मालमत्तेवर बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करणे आदी बाबतची माहिती सादरीकरणातून यावेळी दिली.या बैठकीत सादरीकरणातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
               

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *