जिल्हा प्रशासन महिला बचत गटांना सहकार्य करणार
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार
माविमच्या लोकसंचालित केंद्राची सभा व महिला मेळावा
धाराशिव (प्रतिनिधी) जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत महिला बचत गटांचे जाळे तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचलेले आहे.या महिलांनी छोट्या-मोठ्या उद्योगापासून महिन्याला एक महिला आज साठ हजार रुपये कमाई करत आहे.ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.विशेष म्हणजे शासकीय योजना सक्षमपणे राबविण्यामध्ये महिलांचा ५० टक्क्यांपेक्षा जास्त वाटा आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास माविमच्या माध्यमातून आमच्याकडे प्रस्ताव पाठविल्यास त्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता दिली जाईल.त्यामुळे महिला बचत गटांना जिल्हा प्रशासन जी मदत लागेल ती मदत करण्यास आम्ही निश्चितपणे सहकार्य करणार.असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.
आज धाराशिव येथील कै.पवन राजे कॉम्प्लेक्समध्ये महिला व बाल विकास विभाग अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्योग विकास प्रकल्प अंतर्गत माता सावित्री लोकसंचलित साधन केंद्र यांची चौदावी वार्षिक सर्वसाधारण सभा व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक एस.बी.चिंचोलकर, मराठवाडा विभागीय सल्लागार संदीप मराठे,नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक चैतन्य गोखले,जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक चिन्मय दास,जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी किशोर गोरे,जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल बळे, बारामती येथील हिंदुस्तान किड्सचे विस्तार व प्रशिक्षण विभाग प्रमुख शिरीष मिराशी,ट्रेनिंग स्पेशालिस्ट मुख्य कार्यकारी अधिकारी मेघा कश्यप यांच्यासह लोकसंचलित साधन केंद्र अध्यक्ष व इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री.पुजार म्हणाले की, बचत गटाची वार्षिक सर्वसाधारण सभा बचत गटातील महिला सण व उत्सवासारखे साजरा करतात,ही बाब खरोखर प्रेरणादायी व आनंददायी असून ते महिलांचे कर्तुत्व सिद्ध करते.आज जिल्ह्यामध्ये बचत गटांच्या महिला आपल्या उद्योगाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल करीत आहेत.फक्त उद्योग नाही तर त्या कुटुंबामध्ये सकारात्मक बदल घडवून आणत असल्याचे त्यांनी नमूद केले.विशेष म्हणजे अनेक महिला छोट्या उद्योगांच्या माध्यमातून दर महिन्याला ६० हजार रुपयापर्यंत उलाढाल करीत असून ही अतिशय प्रशंसनीय बाब तर आहेच, शिवाय त्या परिवाराला सावरण्याचे काम करीत आहेत.तसेच प्रधानमंत्री लखपती दीदी योजना सुरू असून या अंतर्गत सर्वच महिलांनी वेगवेगळे नवीन व्यवसाय सुरू केले तर वर्षाला मोठ्या प्रमाणात उलाढाल तर होईलच परंतू महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मोलाची मदत होणार असल्याची त्यांनी सांगितले.
बचत गटामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका निभावत असलेल्या दशसूत्री या कल्पनेचे या महिलांनी तंतोतंत पालन करून त्याची प्रत्यक्षात त्यांनी अंमलबजावणी केल्यामुळे या महिलांना बचतीचे व व्यवसायाचे गमक सापडल्याचे सांगून श्री.पुजार म्हणाले की,सर्वात महत्त्वाचे म्हणजे बचत गटातील महिलांनी बचत करण्याबरोबरच आपल्या पाल्यांना उच्च शिक्षण देऊन उच्च अधिकारी केले असल्याचा सर्वांना अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले.आपला जिल्हा मागास म्हणजेच अविकसित असला तरी एका उद्योजकाने भाग्यश्री हॉटेलच्या माध्यमातून धाराशिव शेळीच्या मटणाला जगाच्या पातळीवर नेल्याचे त्यांनी आवर्जून विशेषत्वाने सांगत रेशीम शेती, पशुपालन फळ प्रक्रिया व विविध प्रक्रिया उद्योग उभारावे असे आवाहन पुजार यांनी केले.
प्रास्ताविक जिल्हा समन्वयक एस.बी.चिंचोलकर यांनी, सूत्रसंचालन लोकसंचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापक श्रद्धा एडके यांनी व उपस्थितांचे आभार उपजीविका व्यवस्थापक अमर बनसोडे यांनी मानले.या कार्यक्रमास दीड हजारांहून अधिक महिला उपस्थित होत्या.
यशस्वी महिलांचा पुरस्काराने सन्मान
यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात उत्कृष्ट उद्योजक म्हणून तृप्ती पेठे,प्रज्ञा खंडाळकर,ज्योती गुरव,मंदा लांडगे,प्रमिला देशमुख, लतिका क्षिरसागर,हिना शेख,जुलैखा शेख व प्रेमा हावळे यांचा तर उत्कृष्ट सीआरपी म्हणून पूजा पवार,वंदना क्षीरसागर,वंदना सुर्यवंशी व दीपाली माने यांचा तसेच आदर्श माता म्हणून कल्पना देशमुख,शालिनी गायकवाड, संगीता अदाने,निर्जला तेरकर व रेखा सुरवसे यांचा आणि उत्कृष्ट गट म्हणून सद्गुरु,हिरकणी,अफसाना,प्रगती,
अक्षरा,श्री,शांकभरी,अलिषा,
शिवपार्वती जनाई,श्री गुरुदत्त,मौलाना व पंचशील महिला बचत गट तसेच उत्कृष्ट स्टाफ म्हणून संगीता घोडके यांचा आणि संयुक्तदायित्व गट म्हणून ईश्वरी,अमृततुल्य,पुष्पा,गौरी नंदन, संजीवनी,महालक्ष्मी श्री गुरुदेव आदींचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
