मेडसिंगा येथे ओंकार प्रतिष्ठान जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन
धाराशिव (प्रतिनिधी) –धाराशिव तालुक्यातील मेडसिंगा येथील युवा नेते ओंकार दत्तात्रय आगळे यांच्या वाढदिवसानिमित्त ओंकार मित्र मंडळाच्या सहकार्याने ओंकार प्रतिष्ठान जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन थाटात पार पडले. उद्घाटनाची पूजा चेअरमन महादेव लाकाळ यांच्या हस्ते करण्यात आली. नारळ फोडण्याचा मान काकाजी आगळे (पोलीस पाटील) यांना मिळाला, तर उद्घाटनाची रिबीन माजी नायब तहसीलदार महादेव आप्पा पाटील यांनी कापली. यावेळी निवृत्ती बापू लाकाळ यांनी तुळजाभवानी मातेची पूजा केली आणि ओंकार आगळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली.
या प्रसंगी गावातील ज्या पोलवर बल्ब नाहीत तेथे बल्ब बसवण्याची जबाबदारी ओंकार आगळे यांनी स्वीकारली. हे बल्ब बसवण्यासाठी अविनाश जाधव यांच्याकडे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रावण शित्रे व उपाध्यक्ष दिलीप घेवारे यांच्या हस्ते बल्ब देण्यात आले. कार्यक्रमानंतर केक कापून व फटाके फोडून ओंकार आगळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. उपस्थितांनी शुभेच्छा देऊन सत्कार केला. या सत्काराला उत्तर देताना ओंकार आगळे म्हणाले की, “ओंकार प्रतिष्ठान सदैव जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध राहील. प्रत्येक गरजवंताला मदत व सहकार्य करण्याचे वचन आम्ही देतो.”
माजी सैनिक रामराव राऊत यांनी ग्रामपंचायतीकडून होत असलेल्या गैरसोयींबद्दल खंत व्यक्त केली. तर मेडसिंगा पॅटर्नचे जनक दत्ता बाबा आगळे यांनी जनतेच्या वैयक्तिक, सामाजिक व सार्वजनिक समस्या सोडवण्यासाठी हे कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावेल असे सांगितले. शेतकरी, विद्यार्थी, कामगार, निराधार महिला यांना शासकीय व सहकारी योजना उपलब्ध करून देणे, ग्रामपंचायतीतील अडचणी दूर करणे आणि कर्मचाऱ्यांना जबाबदारीने काम करण्यास प्रवृत्त करणे हे या प्रतिष्ठानचे ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाला माजी सरपंच संगीता आगळे, सोसायटी सदस्य नागनाथ पडवळ, ग्रामपंचायत सदस्य पती दादाराव कांबळे, ज्ञानदेव पडवळ, माजी सदस्य नितीन राऊत, बाळासाहेब रणदिवे, वसंत पाटील, संभाजी फरताडे, सुदर्शन पडवळ, दत्ता शेलार, बालाजी वाघमारे, श्रीनिवास जाधव, लखन लाकाळ, माणिक पडवळ, अजय भोजगुडे, विलास खिल्लारे, विश्वास शित्रे, समाधान भोरे, संतोष रणदिवे, अंकुश लाकाळ, महेश घेवारे, दादा साठे, अनिल फरताडे, दादा लांडगे, युवराज पडवळ यांच्यासह गावातील अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुक्राचार्य शेलार यांनी केले तर सुदर्शन आगळे यांनी आभार मानले. सर्वांसाठी अल्पोपहार व चहा पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाची सांगता समाधानाच्या वातावरणात झाली आणि ओंकार प्रतिष्ठान जनसंपर्क कार्यालयाचे कामकाज अधिकृतपणे सुरू झाले.
