धाराशिव-बोरफळ रस्त्याच्या कामात मोठा घोटाळा? लोकआंदोलन न्यासाचा जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन
धाराशिव – धाराशिव ते बोरफळ रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाने सुरू असल्याचा गंभीर आरोप लोक आंदोलन न्यासाने केला असून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, संबंधित रस्त्याचे काम नियमबाह्य पद्धतीने होत आहे. रस्त्याचे संपूर्ण कटिंग न करता फक्त डांबर लेयर टाकला जात आहे. एका मीटरपर्यंतही खोदकाम केले गेलेले नाही. त्यावरून योग्य रीतीने सॉलींग व कंपॅक्शनही करण्यात आलेले नाही. परिणामी पावसाचे पाणी रस्त्यावर साचून तो पूर्णपणे उखडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
फक्त कागदोपत्री काम दाखवून, प्रत्यक्षात ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांनी हातमिळवणी करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. रस्त्याचे काम ज्या पद्धतीने सुरू आहे, त्यामध्ये शासकीय निधीचा प्रचंड अपव्यय होणार असून काही महिन्यांतच हा रस्ता पुन्हा खराब होणार असल्याचे लोक आंदोलन न्यासाने स्पष्ट केले.
दरम्यान, काम नियमाप्रमाणे करून रस्ता दर्जेदार करण्यात आला नाही, तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू असा इशारा लोक आंदोलन न्यासाच्या वतीने देण्यात आला आहे.या निवेदनावर जिल्हाध्यक्ष मनोज खरे, संदीप माळकर, गालिबखान पठाण, मनोज जाधव व परमेश्वर विंचुलकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत



