
फसवणुकीचा गुन्हा दाखल: शेतकऱ्यांची लाखोंची सोयाबीन बिनपैशात नेत फसवणूक
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील दोघांनी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून लाखो रुपयांची सोयाबीन खरेदी करून पैसे न देता फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संदीप भाऊराव मोरे आणि मन्नत रामलिंग तोडकरी, दोघेही रा. बार्शी, जि. सोलापूर यांनी 28 डिसेंबर 2024 ते 20 जानेवारी 2025 या कालावधीत वाशी तालुक्यातील सोनारवाडी येथील नारायण वैजीनाथ घोळवे (वय 68) व इतर शेतकऱ्यांकडून एकूण 552 कट्टे सोयाबीन खरेदी केली. या मालाची एकूण किंमत सुमारे 13 लाख 27 हजार 863 रुपये इतकी आहे.
आरोपींनी शेतकऱ्यांना “थोड्या दिवसात पैसे देतो” असे सांगून माल नेला; मात्र त्यानंतर त्यांनी पैसे दिले नाहीत आणि शेतकऱ्यांशी संपर्क टाळला. ही संपूर्ण बाब फसवणूक व विश्वासघाताची असल्याचे स्पष्ट होताच नारायण घोळवे यांनी 12 जून 2025 रोजी येरमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
यावरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भा.दं.वि. कलम 318(4), 316(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास येरमाळा पोलीस करत आहेत.