
महावितरणच्या आऊटसोर्सिंग एजन्सीची आमदार कैलास पाटील यांनी केली पोलखोल
धाराशिव ता. 17: महावितरण मनुष्यबळ पूरविण्यासाठी एजन्सी नेमते. पण या एजन्सीकडून मनमानी कारभार होत आहे. कर्मचाऱ्याना कुठे नियुक्ती द्यायची हे अधिकार महावितरणकडे घेण्याची मागणी आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात केली. त्यावर मंत्री मेघना बोर्डीकर यांनी याबाबत विचार करु असे उत्तर दिले.
महावितरणच्या कंत्राटी कर्मचारी नियुक्तीसाठी दरवर्षी एजन्सी बदलते. तेव्हा नवीन एजन्सीकडून कर्मचाऱ्याची आर्थिक पिळवणूक होते. सेवेत राहण्यासाठी पैशाची मागणी होते. शिवाय कर्मचाऱ्याना नियुक्ती कुठे द्यायची हे सुद्धा या एजन्सीना अधिकार दिले आहेत. हे अधिकार महावितरण कंपनीला असले पाहिजेत अशी अपेक्षा आमदार कैलास पाटील यांनी सरकारकडे केली. कर्मचाऱ्याना त्रास देत असतील तर त्यानी तक्रार करावी त्यावरून कारवाई केली जाईल असं उत्तर मंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले. त्यावर आमदार पाटील यांनी धाराशिव येथे कर्मचाऱ्यानी आंदोलन केल्याचं सांगितलं, सरकार कर्मचारी कुठे नियुक्ती करायचा हे अधिकार महावितरणकडे घेणार का यावर स्पष्ट सांगाव असा थेट सवाल केला. उत्तर देताना सरकार यावर विचार करेल असे मंत्री बोर्डीकर यांनी सांगितलं.