
पराभवामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या धीरज पाटलांची वायफळ बडबड…!
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात पोलीस योग्य दिशेने तपास करत आहेत. या प्रकरणाचा पोलीस पूर्णतः छडा लावतील यावर आमचा ठाम विश्वास आहे. भाजपा पक्ष म्हणून आम्ही सर्व पदाधिकारी तपासात पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करीत आहोत. आरोपी कोणीही असो, कोणत्याही पक्षचा असो, त्याची अजिबात गय केली जाणार नाही हे आमचे नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. विधानसभेतील पराभवानंतर वैफल्यग्रस्त झालेल्या धीरज पाटील यांनी हवेतल्या गप्पा न मारता पोलिसांना ठोस पुरव्यानिशी सहकार्य करावे असे आव्हान माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी केले आहे.
आम्ही डिसेंबर महिन्यात दिलेल्या माहितीच्या आधारेच पोलिसांनी या प्रकरणाचे धागेदोरे शोधून काढलेले आहे. त्यानंतर आता अनेकांना राजकीय कंठ फुटला आहे. बेछूट आरोपांची राळ उठवणाऱ्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी एकदा तरी पोलिसांकडे ड्रग्ज विरोधी कारवाईची मागणी केली होती काय..? पोलिसांच्या कारवाईनंतर मोठा आव आणणाऱ्या धीरज पाटलांनी त्यापूर्वी या प्रश्नाबाबत काय केले याचा पुरावा सर्वसामान्य नागरिकांना द्यावा. कांही आरोपींचे भाजपशी संबंध जोडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न महाविकास आघाडीची मंडळी राजकीय आकसापोटी करत आहेत.
दुर्दैवाने ड्रग्जच्या या विळख्यात सगळ्या पक्षाशी संबंधित असलेले लोक गुंतले असल्याचे पोलिसांच्या माहितीनुसार समोर येत आहे.
ड्रग्ज हा मोठा सामाजिक प्रश्न आहे त्याला राजकीय स्वरूप देऊन महाविकासआघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी बालिशपणा करू नये.
आरोपींचे भाजप नेत्यांसोबत असलेले फोटो शेयर करणे अत्यंत हास्यास्पद आहे. आज तुम्ही ज्यांचे फोटो भाजप नेत्यांशी जोडून दाखवत आहात, तेच काँग्रेसमध्ये असताना त्यांच्यासोबत तुम्ही मांडीला मांडी लावून का बसत होतात ? मग ते फोटो आम्हीही चव्हाट्यावर आणावेत काय..? असा सवालही सचिन रोचकरी यांनी उपस्थित केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री स्वतः देवेंद्रजी फडणवीस साहेब याप्रकरणावर बारीक लक्ष ठेवून आहेत. ड्रग्जचे उच्चाटन करण्यासाठी पक्ष म्हणून आम्हीही बांधील आहोत. त्यामुळे धीरज पाटील यांच्या कोणाच्या तरी सांगण्यावरून जाणीवपूर्वक राजकीय आकस बाळगू नये अशा शब्दात सचिन रोचकरी यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांना फटकारले आहे.