तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेची कवड्याची माळ,जिल्ह्याचे पर्यटन,आणि कुंथलगीरीच्या खव्यावर आधारित अभ्यासक्रम आगामी शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार : सिनेट सदस्य देविदास पाठक
धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव जिल्ह्याचे वैभव असलेल्या तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेच्या कवड्याची माळ आणि जिल्ह्याची वेगळी ओळख असलेल्या कुंथलगिरिच्या खव्यावर आणि जिल्ह्याचे पर्यटन यावर आधारित विविध कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम आगामी शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची तसंच धाराशिव येथील विद्यापीठ उपकेंद्रात प्री – आयएएस आयपीएस स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र आणि फॉरेन लँग्वेज कोर्सेस सुरू करण्यासंदर्भात प्रयत्न सुरू असल्याची माहिती सिनेट सदस्य देविदास पाठक यांनी दिली. यावेळी विद्यापीठ उपकेंद्रातील क्रीडांगणासह मुलांचे वस्तीगृह आणि विद्यापीठ उप परिसरासाठी या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्यात आली. त्याला सिनेट सभागृहाने मंजुरी देखील दिली. तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेच्या कवड्याच्या माळेला आणि कुंथलगिरीच्या खव्याला भारत सरकारचा नुकताच भौगोलिक मानांकन मिळाले आहे, धाराशिव जिल्ह्याचे पर्यटन , कवड्याची माळ ,कुंथलगिरीचा खवा यावर आधारित विविध कौशल्य अभ्यासक्रमांचा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश व्हावा आणि विद्यापीठ उपकेंद्रात अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील विविध महाविद्यालयात विद्यार्थ्यांना आगामी शैक्षणिक वर्षापासून याचे कौशल्य शिक्षण मिळावे अशी मागणी देविदास पाठक यांनी केली होती.त्यावर उत्तर देताना महाराष्ट्र स्टेट किल स्किल डेव्हलपमेंट सोसायटी आणि स्किल युनिव्हर्सिटी यांच्यासोबत सामंजस्य कराराची प्रक्रिया सुरू असून आगामी शैक्षणिक वर्षापासून हे नवीन कोर्स सुरू करण्याचे प्रयत्न असल्याची माहिती विद्यापीठाच्या वतीने देण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा सन 2025- 26 चा अर्थसंकल्प मंजूर करण्यासंदर्भात 15 मार्च रोजी झालेल्या अर्थसंकल्पीय सिनेट बैठकीत धाराशिव इथल्या विद्यापीठ उपकेंद्रासाठी संचालकांना खर्चाचे एक लाख रुपयांचे अधिकार देण्यासंदर्भात या बैठकीत मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आता संचालकांना एक लाख रुपयांपर्यंतच्या खर्चाचे अधिकार देण्यात आले आहेत. विद्यापीठ उपकेंद्राने धाराशिव येथील ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक वेदकुमार वेदालंकार यांना नुकताच जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. त्यांचे अप्रकाशित आणि हिंदी अनुवादित साहित्य विद्यापीठाच्या माध्यमातून प्रकाशित करण्याचा मनोदयही यावेळी विद्यापीठाने व्यक्त केला आहे या संदर्भात सिनेट सदस्य नाना गोडबोले देविदास पाठक यांनी सभागृहात विषय उपस्थित केला. धाराशिव येथील विद्यापीठ उपकेंद्रात विद्यार्थ्यांना विविध कागदपत्र तसेच शैक्षणिक सुविधा मिळाव्या यासाठी विद्यापीठाने तयार केलेल्या विशेष ॲपच्या माध्यमातून आगामी शैक्षणिक वर्षापासून या सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती यावेळी विद्यापीठाच्या वतीने सभागृहात देण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरांना तसेच महाविद्यालय स्तरावर होणाऱ्या पदवीदान समारंभांना विद्यापीठ प्राधिकरण सदस्यांना निमंत्रित करण्याचा मुद्दा देविदास पाठक यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला त्यावर कुलगुरूंनी या दोन्ही विषयात तात्काळ परिपत्रक काढण्यात येणार असल्याचे सांगितले.