धाराशिव रेल्वेस्थानक पूर्वी प्रस्तावित होते, त्यापेक्षा तिप्पट मोठे होणार आहे. पर्यायी रेल्वेमार्ग उभारला जाणार आहे. प्रवाशांसह कर्मचारी आणि अधिकार्यांकरिता अद्ययावत सोयी-सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. रस्त्यांच्या वरून आणि खालून जाणार्या पुलांची संख्याही वाढविण्यात आली आहे. सोलापूर शहरातील जमीन रेल्वेमार्गासाठी संपादन करण्याकरिता तेथील सध्या प्रचलित असलेले दर गृहित धरण्यात येणार आहेत. वरील सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करून धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गासाठी ३२९५ कोटी रूपयांच्या सुधारीत आराखड्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. धाराशिवला जंक्शन रेल्वे स्थानक होणार, अर्थकारणाला गतीही मिळणार आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे तीर्थक्षेत्र आता लवकरच रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशावर झळकणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढीव प्रकल्प किंमतीनुसार रेल्वे बोर्डाने निधीची तरतूद करावी, अशी मागणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली होती. त्यानुसार रेल्वे बोर्डाने ५० टक्के तरतूद केल्यानंतर उर्वरित ५० टक्के राज्य हिश्याचा वाटा देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार ३२९५ कोटी रूपयांच्या सुधारित आराखड्यावर राज्य मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. एकूण ८४.४४ किलोमीटर लांबीच्या या रेल्वेमार्गासाठी ९०४ कोटी ९२ लाख रूपयांची मंजुरी देण्यात आली होती. आता त्यामध्ये तिपटीपेक्षा अधिक वाढ झाली आहे. आपण सातत्याने विधीमंडळात हा विषय लावून धरला होता. ठाकरे सरकारच्या कालावधीत तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांनी तातडीने या महत्वपूर्ण रेल्वेमार्गासाठी राज्याचा ५० टक्के हिस्सा देण्याचा पावले उचलावीत, असा पाठपुरावाही आपण केला होता. परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. आपल्या महायुती सरकारने सुधारीत आराखड्यानुसार ५० टक्के राज्य हिश्याचा वाटा देण्यास हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यामुळे कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे तीर्थक्षेत्र असलेले तुळजापूर रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशावर आता झळकणार आहे. त्याचबरोबर तुळजापूर ते सोलापूर या टप्प्यातील रेल्वेमार्गाच्या कामालाही गती मिळणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
मुख्य रेल्वेस्थानकाची इमारत चार हजार चौरस मीटरवरून आता १२ हजार ६३० चौरस मीटर होणार आहे. एकंदरीत रेल्वे स्थानकाची इमारत तिप्पट मोठी होणार आहे. वेगात जाणार्या जलदगती रेल्वेगाड्यांना तत्काळ मार्ग मिळावा यासाठी आवश्यक असणारी पर्यायी व्यवस्थाही उभारली जात आहे. यार्डाच्या आवश्यकतेनुसार मोठ्या लांबीची लूपलाईनही अंथरली जाणार आहे. पूर्वी रस्त्याखालून जाणार्या पुलांची संख्या २० होती. आता त्यात वाढ करण्यात आली असून रस्त्याखालून रेल्वेमार्गासाठी ३१ पूल उभारले जाणार आहेत. सेालापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील सर्वात महत्वाच्या पुलाची लांबी वाढविण्यात आली आहे. ३८५ मीटरऐवजी हा पूल ३९९ मीटर एवढा लांब असणार आहे. प्रवाशांसाठी अनेक महत्वपूर्ण सोयी-सुविधांचा या आराखड्यात अंतर्भाव करण्यात आला आहे. पथमार्ग, दादरा, प्लॅटफॉर्म यासह जमिनीखाली आणि जमिनीच्या वर पाण्याच्या मोठ्या टाक्या उभारल्या जाणार आहे. त्यासाठीही दुप्पट जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रेल्वे अधिकारी आणि कर्मचार्यांच्या निवासस्थानांची संख्या ३४२ वरून ३७३ करण्यात आली आहे. त्यासाठी सुधारित आराखड्यानुसार राज्य मंत्रिमंडळाने ३२९५ कोटी रूपयास मान्यता दिली असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
ठाकरे सरकारमुळे रखडलेल्या रेल्वेमार्गाला महायुती सरकारमुळे गती
ठाकरे सरकारने राज्य हिश्श्याचा ५० टक्के वाटा न दिल्यामुळेच धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाचे काम अडीच वर्षे रखडले होते. त्यामुळे प्रकल्प किंमतीतही तब्बल ११७.४९ टक्के वाढ झाली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ९०४.९२ कोटी रूपयांच्या मूळ प्रकल्प किंमत असलेल्या धाराशिव-तुळजापूर-सोलापूर या रेल्वेमार्गासाठी आता ३२९५ कोटी रूपये लागणार आहेत. त्याचवेळी ठाकरे सरकारने हे पैसे उपलबध करून दिले असते तर रेल्वेमार्ग कदाचित आतापर्यंत पूर्णही झाला असता. यापूर्वी राज्य सरकारने मूळ प्रकल्प किमतीनुसार ४५० कोटी रुपयांचा राज्य हिश्श्याचा वाटा दिलेला आहे. आता वाढीव २००० कोटींपैकी १००० कोटींचा राज्य वाटा देण्यासही राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. ठाकरे सरकारमुळे रखडलेल्या रेल्वेमार्गाला आपल्या महायुती सरकारमुळे आता गती मिळाली असून धाराशिव जिल्ह्यातील जनतेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे व अजितदादा पवार यांचे आपण आभार मानतो असे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.