
रक्तदात्यांनी रक्तदानासाठी समोर यावे – अब्दुल लतिफ
धाराशिव – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव येथील रक्त पेढीत रक्तसाठा पुरेसा नसून रुग्णासाठी दररोज रक्त आवश्यक असुन रक्तदात्यांनी रक्तदानासाठी समोर येऊन रक्तदान करावे, सामाजिक संस्था, शाळा, कॉलेज, बॅक व इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील शासकीय रुग्णालयात रक्तदान करण्यासाठी शिबिरांचे आयोजन करावे असे आवाहन रुग्ण कल्याण समिती सदस्य अब्दुल लतिफ यांनी दि.१३ मे रोजी केले.
धाराशिव शहरातील श्री श्री रविशंकर यांच्या जयंतीनिमित्त जयप्रकाश कोळगे यांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले होते. त्यात त्यांनी रक्तदान केले. तसेच त्यांनी आतापर्यंत ४० वेळा रक्तदान केले असून त्यांच्यासोबत महिला भगिनींनी देखील रक्तदान केले. रक्तदान केल्यानंतर रुग्ण कल्याण समिती, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडून रक्तदात्यांना ट्राॅफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ईथिकल कमिटी सदस्य गणेश वाघमारे, प्रदिप पांढरे, वैद्यकीय रक्तसंक्रमण अधिकारी डॉ राजेंद्र लोंढे, विठ्ठल कांबळे, गणेश साळुंखे, रक्तदाते, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.