धाराशिव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी पंचनाम्याचे आदेश
धाराशिव (प्रतिनिधी) : धाराशिव तालुक्यात झालेल्या मुसळधार पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतजमिनीतील उभ्या पिकांचे नुकसान, घरे व शेतीसंबंधी साधनसंपत्तीचे झालेले नुकसान लक्षात घेऊन शासन निर्णयानुसार तातडीने पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार मृणाल जाधव यांनी दिले आहेत.
या आदेशानुसार महसूल मंडळ अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी, तलाठी व ग्रामसेवक यांना आपल्या हद्दीतील गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे सादर करण्यास सांगितले आहे. पंचनाम्यात शेतजमिनींचे GPS सक्षम फोटो, शेतकऱ्यांचे मोबाईल क्रमांक तसेच आवश्यक कागदपत्रांचा समावेश असणे अनिवार्य राहील.
पिकांचे पंचनामे शासन निर्णयानुसार Annexure-8 व Annexure-9 या स्वरूपात करण्यात येणार आहेत. संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी निश्चित वेळेत अहवाल तहसील कार्यालयात सादर करणे बंधनकारक असेल. कोणतीही ढिलाई आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही आदेशपत्रात देण्यात आला आहे.
