तालुकास्तरीय लोकशाही दिनाची बैठक उत्साहात; गैरहजर कार्यालय प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस
धाराशिव (प्रतिनिधी) – तालुकास्तरीय लोकशाही दिनाची बैठक आज तहसीलदार मृणाल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत उपस्थित नागरिकांना लोकशाही दिनाचे महत्त्व पटवून देण्यात आले. सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी तत्परतेने सोडवण्यासाठी विविध शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
बैठकीत एकूण सहा तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या संबंधित विभागांकडे सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी तहसीलदार जाधव यांनी स्पष्ट निर्देश दिले की, गैरहजर राहिलेल्या कार्यालय प्रमुखांना तसेच प्रतिनिधी पाठवणाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल. पुढे प्रत्येक महिन्यात होणाऱ्या लोकशाही दिनाच्या बैठकीस संबंधित कार्यालय प्रमुखांनी स्वतः हजर राहणे सक्तीचे असेल, असेही त्यांनी सूचित केले. तक्रारींचा तात्काळ निपटारा करणे ही सर्व कार्यालय प्रमुखांची जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
बैठकीत लघुपाटबंधारे जिल्हा परिषद उपविभाग धाराशिव, एस.टी. महामंडळ आगार व्यवस्थापक, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, गटशिक्षण कार्यालय, मंडळ अधिकारी केशेगाव, सहाय्यक निबंधक धाराशिव, मंडळ अधिकारी ढोकी, मंडळ अधिकारी आंबेजवळगा, तालुका आरोग्य अधिकारी, पाटबंधारे उपविभाग क्र. १, महावितरण उपविभाग तसेच मृदा व जलसंधारण उपविभाग धाराशिव या विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.बैठकीचा समारोप दुपारी साडेबारा वाजता तहसीलदार मृणाल जाधव यांनी केला.
