महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे सहानुभूतीने लक्ष द्या – महसूल मंत्री बावनकुळे यांना धाराशिवमध्ये निवेदन

महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे सहानुभूतीने लक्ष द्या – महसूल मंत्री बावनकुळे यांना धाराशिवमध्ये निवेदन

Spread the love

धाराशिव | महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या धाराशिव जिल्हा दौऱ्याच्या निमित्ताने जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी संघटनेच्या प्रतिनिधींनी मंत्री महोदयांना निवेदन सादर करत महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे लक्ष वेधले.

निवेदनात म्हटले आहे की, महसूल विभाग हा राज्य शासनाचा एक प्रमुख प्रशासकीय घटक असून, नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे पोहोचवण्याचे काम हे महसूल अधिकारी व कर्मचारी प्रामाणिकपणे करत आहेत. शासकीय आदेशांचे पालन, योजना कार्यान्वयन आणि महसूल संकलन यामध्ये महसूल विभागाचा मोठा वाटा असूनही विभागातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आजही संघर्ष करावा लागत आहे.

महसूल विभागातील कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून विविध वेतन त्रुटी, सेवा धोरण आणि आकृतीबंधासंदर्भातील समस्यांचा सामना करत आहेत. विशेषतः 2006 पासून प्रलंबित असलेला महसूल विभागाचा आकृतीबंध आजही शासन दरबारी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. त्याचप्रमाणे, नायब तहसीलदार आणि महसूल सहाय्यक (लिपिक) संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीसंबंधी त्रुटी दूर करून त्यांना योग्य ते आर्थिक हक्क मिळावेत, अशी मागणी संघटनेने केली आहे.

धाराशिव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष प्रमोद चंदनशिवे, सरचिटणीस दीपक चिंतेवार आणि अध्यक्ष नितेश काळे यांनी मंत्री महोदयांना हे निवेदन सादर करून, प्रलंबित मागण्यांबाबत सहानुभूतीने विचार करून तात्काळ निर्णय घेण्याची नम्र विनंती केली. राज्यातील महसूल कर्मचारी हे प्रशासनाचा आधारस्तंभ असून त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावल्यास महसूल विभागाची कार्यक्षमता अधिक वृद्धिंगत होईल, असेही त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *