
धाराशिव बस स्थानकात मनमानी पध्दतीने दोन ठिकाणी कॅन्टीन सुरु
धाराशिव दि.११ (प्रतिनिधी) – शहरातील बस स्थानकाचे बांधकाम चालू असल्यामुळे बस स्थानकात बस व प्रवाशांना थांबण्यासाठी त्या ठिकाणी जागा अपुरी व कमी आहे. मात्र या ठिकाणी सुहाना एस.टी. कॅन्टीनसाठी २ ठिकाणी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध करून दिली गेली आहे. या बस स्थानाकात कोणत्या आस्थापनांना किती जागा असायला पाहिजे हे नियम एस. टी. महामंडळातील संबंधित अधिकाऱ्यानी मोडीत काढून कॅन्टीन मालकाशी संगनमत करून या ठिकाणी दोन कॅन्टीन सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे संबंधिता विरोधात कारवाई करावी, अशी मागणी मनोज खरे यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, भ्रष्टाचार करत या बस स्थानकाचे बांधकाम चालू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात धुळ उडत आहे. ती धुळ या कॅन्टीनमधील अन्न पदार्थावर बसत असून ते पदार्थ व्यवस्थीत ठेवलेले नसतात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होवू शकतो. तसेच दोन ठिकाणी सुहाना कॅन्टीन चालू असल्याबाबत तसे एसटी महामंडळाचे परवानगी प्रमाणपत्र व इतर कोणतेच प्रमाणपत्र देखील लावलेले दिसून येत नाहीत. एवढ्या मोठ्या सार्वजनिक ठिकाणी हे अन्न व औषध प्रशासन विभाग व एस.टी. महामंडळ कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्याशी संगनमताने हे कॅन्टीन चालू आहे. त्या कॅन्टीला नियमाने असायला पाहिजे तेवढीच जागा त्यांना देण्यात यावी. तसेच त्या कॅन्टीनच्या सर्व प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात यावी. तर विक्री करीत असलेल्या पदार्थांचे दरफलक लावण्याची सक्ती करून संबंधित संगणमत करणाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करून गुन्हे नोंद करावेत, अशी मागणी खरे यांनी केली आहे.