तुळजाभवानी मंदिर दानपेटी घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल न केल्यास आंदोलन – घनवट

तुळजाभवानी मंदिर दानपेटी घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल न केल्यास आंदोलन – घनवट

Spread the love

उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश




धाराशिव – श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात ८ कोटी ४५ लाख ९७ हजार रुपयांचा दानपेटी घोटाळा झाला होता. या भ्रष्टाचारात सरकारी अधिकारी गुंतले असल्यामुळे त्यांना प्रशासन वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असे ताशेरे ओढत या घोटाळ्याचा तपास बंद करण्याचा शासनाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने रद्दबातल ठरवला आहे. तर आधीच्या चौकशी समितीने दोषी ठरवलेले लिलावदार, मंदिर कर्मचारी, विश्वस्त, शासकीय अधिकारी-कर्मचारी आदी १६ दोर्षीवर तुळजापूर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी तसेच या प्रकरणात दोषी असलेल्या प्रत्येकावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. न्यायालयाने आदेश दिलेले असताना देखील गुन्हे दाखल केले नाहीत. जर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ केली तर आम्ही आंदोलन करणार असल्याचा इशारा हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड संघटक सुनील घनवट यांनी दि.१७ मे रोजी दिला.

धाराशिव शहरातील कुडाळ यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी हिंदु विधीज्ञ परिषदेचे ऍड. सुरेश कुलकर्णी, तुळजाभवानी पुजारी मंडळाचे किशोर गंगणे, ऍड. शिरीष कुलकर्णी व हिंदु जनजागृती समितीचे धाराशिव जिल्हा समन्वयक राजन बुणगे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना घनवट म्हणाले की, तुळजाभवानी मंदिर दानपेटी घोटाळा प्रकरणी हिंदु जनजागृती समितीच्या प्रयत्नांना मोठे यश आले असून या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षक दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली चालू ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याचेअसल्याचे त्यांनी सांगितले. तर ऍड.सुरेश कुलकर्णी म्हणाले की, श्री तुळजाभवानीदेवी मंदिराला पूर्णवेळ जिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी मुख्य प्रशासक म्हणून नेमावा. मंदिर समितीकडे आजही स्वतःची घटना अथवा नियमावली नाही, ती त्वरित बनवण्यात यावी. तसेच मंदिर परिसरात सीसीटिव्ही कॅमेन्यांची संख्या वाढवावी आणि त्याचे फुटेज कायमस्वरूपी जतन करून ठेवण्यासह मंदिर परिसराचे सुरक्षा परीक्षण दरवर्षी करावे. मंदिरात जमा होणारे दान स्वरूपातील धन, सोने व चांदी याचे परीक्षण दरवर्षी लेखा परीक्षकांकडून करावे, अशा महत्त्वाच्या मागण्या आम्ही शासनाकडे केल्या असल्याचे त्यांनी सांगितले. जर प्रशासनाने कारवाई करण्यास दिरंगाई केली तर आम्हाला उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी अवमान याचिका दाखल करावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.


महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी दागिने अपहार प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून त्याचा तपास संथ गतीने सुरू आहे. हा तपास लवकरात लवकर पूर्ण करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी किशोर गंगणे यांनी केली.



तुळजाभवानी देवी मंदिर दानपेटी घोटाळा प्रकरणी सीआयडीने सादर केलेल्या अंतिम अहवालामध्ये ४२ अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे. जरी उच्च न्यायालयाने १६ व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असले तरी आम्ही उर्वरित २६ व्यक्तींवर विभागीय चौकशीची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *