जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सारोळा बुद्रुक येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
धाराशिव (प्रतिनिधी) – गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, सारोळा बुद्रुक येथे उत्साहात व स्नेहपूर्वक वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी गुरूंविषयी आपली कृतज्ञता व्यक्त केली आणि शाळेच्या वातावरणात आध्यात्मिक आणि सांस्कृतिक आनंदाची लहर निर्माण झाली.
कार्यक्रमाच्या विशेष आकर्षण ठरले तुळजापूर येथून आमंत्रित कवी प्रदीप पाटील. त्यांनी आपल्या विनोदी, प्रासंगिक व भावस्पर्शी कवितांद्वारे विद्यार्थ्यांची मनं जिंकली. त्यांच्या बहारदार सादरीकरणामुळे संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नामदेव आप्पा खरे, मुख्याध्यापक वणकळस सर, पालक प्रतिनिधी दत्ता टिंगरे कुंभार, शिक्षकवर्ग, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात एक विशेष उपक्रम म्हणून अंध व अपंग बांधवांसाठी निधी जमा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या सामाजिक जाणीवेचे सर्वांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत सुरळीत व अनुशासित पद्धतीने पार पडलं असून, गुरुपौर्णिमा साजरी करताना विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, कृतज्ञता व सामाजिक बांधिलकीची भावना दृढ झाली, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.


