तामलवाडीच्या ३६७ एकरात साकारणार एमआयडीसीअधिसूचना जारी; आ. राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

तामलवाडीच्या ३६७ एकरात साकारणार एमआयडीसी

अधिसूचना जारी; आ. राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Spread the love



तामलवाडी ता. तुळजापूर येथे ३६७ एकरावर नवीन औद्योगिक क्षेत्र (एमआयडीसी) स्थापन करण्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिवेशन संपल्यानंतर १४ जुलैला गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या उद्योजकांची सोलापूर येथे बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

पर्यटनासह उद्योगांच्या माध्यमातून १०,००० रोजगार निर्मितीवर भर देण्यासाठी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी तामलवाडी ता. तुळजापूर येथे नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना एमआयडीसी च्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. सोलापूर पासून नजीक व राष्ट्रीय महामार्गावरील ठिकाण तसेच अल्पावधीतच होणारा रेल्वे मार्ग, अशा दळणवळणाच्या भक्कम जाळ्यामुळे तामलवाडी येथे उद्योग व्यवसायांना मोठा वाव आहे.

आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मागणीला उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तामलवाडीला नवीन एमआयडीसी मंजूर केली आहे. यास उच्चाधिकार समितीने मान्यता दिली असून,  याबाबतची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे तामलवाडीला नवीन एमआयडीसी उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून यामुळे या भागातील अर्थकारणाला नवी दिशा मिळणार आहे.

गुंतवणुकीसाठी उद्योजकांसोबत सोलापूरला १४ जुलैला बैठक
तामलवाडी येथे जवळपास ३६७ एकर जमीन औद्योगिक क्षेत्रासाठी उपलब्ध होत आहे. तसेच धाराशिव हा आकांक्षित जिल्हा असल्यामुळे येथे उद्योजकांना प्रोत्साहनपर मोठ्या प्रमाणात सवलती उपलब्ध आहेत. आ. पाटील यांनी काही दिवसापूर्वी सोलापूर येथील उद्योजकांसमवेत घेतलेल्या बैठकीमध्ये अनेक उद्योजकांनी येथे उद्योग सुरू करण्यास उत्सुकता दर्शविली होती. आता या प्रकल्पाला मूर्त रूप आले असून अधिवेशन संपताच १४ जुलै रोजी सोलापूर येथे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसामवेत गुंतवणूकदारांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे येथे जलद गतीने गुंतवणूक होवून जिल्ह्यातील रोजगार निर्मितीसह औद्योगिक विकासाला मोठी गती मिळेल, असे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *